भारतीय सैन्यदलाचा 77 वा वर्धापन दिन यंदा पुण्यात

3 ते 15 जानेवारी दरम्यान होणार कार्यक्रम

पुणे : भारतीय सैन्यदलाचा 77 वा वर्धापन दिन यंदा पुण्यात साजरा होत आहे. यानिमित्त आळंदी रस्त्यावरील बॉम्बे सॅपर्स या लष्करी संस्थेच्या मैदानावर भव्य कार्यक्रम होणार आहे. यानिमित्त 3 ते 15 जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत. सोमवारी याची रंगीत तालीम संपन्न झाली. ती पाहून या परिसरातील नागरिक हरखून गेले.

भारत देश स्वतंत्र होताच 15 जानेवारी 1949 रोजी भारतीय लष्कराच्या प्रमुखपदी ले. जन. के. एम. करिअप्पा यांची निवड झाली. तेव्हापासून 15 जानेवारी हा भारतीय लष्कराचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. शहरात 15 जानेवारी रोजी होणार्‍या कार्यक्रमास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

कार्यक्रम पहिला : (दि.3 ते 5)

दक्षिण कमांड येथे 3 ते 5 जानेवारीदरम्यान आर्मी मेळ्याचे आयोजन केले आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत प्रवेश खुला राहणार आहे.

दुसरा कार्यक्रम : (दि. 7 ते 15)

आळंदी रस्त्यावरील बॉम्बे सॅपर्स या सैन्यदलाच्या मैदानावर लष्कराच्या वतीने संचलनासह अत्याधुनिक शस्त्रांंचे विलोभनीय दर्शन होणार आहे. तसेच, लष्कराच्या वतीने मिशन ऑलिम्पिकसारखे सजीव देखावे साकारणारे रथ या ठिकाणी पाहावयास मिळणार आहेत.

सामान्य नागरिकांसाठी अ‍ॅपवरून नोंदणी

हा सोहळा पाहण्यासाठी लष्कराने सामान्य नागरिकांनाही संधी दिली आहे. या मैदानाची क्षमता केवळ बाराशे लोकांची आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रवेश देण्यासाठी एक अ‍ॅप तयार करण्यात येत असून, ते 1 जानेवारी रोजी खुले केले जाणार आहे. त्यावर नागरिकांनी अर्ज भरून दिल्यावरच त्यावर प्रवेशिका पाठवली जाईल, अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.

सोमवारी झाली रंगीत तालीम

आळंदी रस्त्यावरील बॉम्बे सॅपर्सच्या मैदानावर सोमवारी लष्कराच्या वतीने या संपूर्ण कार्यक्रमाची रंगीत तालीम सादर करण्यात आली. यात लष्कराचे बहारदार संचलन, अत्याधुनिक लष्करी वाहने, हेलिकॉप्टर, रोबोटिक श्वान यांचा यात समावेश होता. या वेळी या भागातील स्थानिक आबालवृद्धांना प्रवेश देण्यात आला होता. लष्करीसामर्थ पाहून लोक भारावून गेले.

मागील बातमी
प्राजक्ता माळीचा नवा सिनेमा
पुढील बातमी
शालेय पोषण आहाराचे होणार ऑडिट

संबंधित बातम्या