जिल्हा बॅंकेची निवडणूक महायुती म्हणून लढणार - ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले; रामराजे, मकरंद पाटील यांच्याशी जागा वाटपाची चर्चा

by Team Satara Today | published on : 28 September 2026


सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची निवडणूक महायुती म्हणून लढवण्याबाबत राज्य स्तरावरुन सुचना आहेत. त्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते रामराजे ना. निंबाळकर, मंत्री मकरंद पाटील व अन्य सहकाऱ्यांशी सोमवारी प्राथमिक चर्चा झाली आहे. जागा वाटपाबाबत लवकरच निर्णय होणार आहे. महायुतीतील सर्वांनी एकत्र येवून लढावे यासाठी आमचा प्रयत्न असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री ना. ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत दिली.
एसआयआरबाबत काँग्रेसच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ना. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सातारा जिल्हा बॅंकेला वेगळा इतिहास आहे. बॅंकेचा कारभार राजकारण विरहित रहावा अशी सर्वांचीच भूमिका आहे. आत्तापर्यंत बॅंकेत कधीही राजकारण आले नाही. बॅंक पुढे न्यायची असेल तर याला बगल आवश्यक आहे. त्यानुसार जिल्हा बॅंकेची निवडणूक महायुती म्हणून लढा अशा सूचना राज्य स्तरावरुन आल्या आहेत. याबाबत मंत्री मकरंद पाटील यांच्याशी रविवारी चर्चा झाली. त्यानुसार सोमवारी साताऱ्यातील हॉटेल प्रीती येथे मंत्री मकरंद पाटील, रामराजे ना. निंबाळकर, खा. नितीन पाटील, आ. धैर्यशील कदम आदींच्या उपस्थितीत महायुतीची प्राथमिक बैठक झाली. महायुती म्हणून निवडणूक लढवण्याबाबत यावेळी चर्चा झाली. सोसायटी मतदारसंघ आपापल्या स्तरावर व उर्वरित १० जागा पॅनेलमधून कशा लढवायच्या यावर चर्चा झाली. यावेळी नगरसेवक अविनाश कदम, विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, सभापती महेश गाडे आदी उपस्थित होते.
मतभेद असले तरी बॅंकेचा विषय महत्वाचा
रामराजे ना. निंबाळकर व मंत्री जयकुमार गोरे यांच्यात जोरदार मतभेद आहेत. त्यामुळे महायुती म्हणून त्यांना एकत्र कसे आणणार असे ना. शिवेंद्रसिंहराजे यांना विचारले असता ते म्हणाले, रामराजे व जयकुमार गोरे यांच्यात मतभेद असू शकतात. मात्र महायुती म्हणून सर्वांनी एकत्र काम करण्याच्या सुचना आहेत. मतभेदापेक्षा बॅंक हा विषय महत्वाचा आहे. मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी महायुती म्हणून एकत्र लढावे यासाठी आमचा प्रयत्न आहे.
पालकमंत्री मुंबईला असल्याने बैठकीस अनुपस्थित
सोमवारी जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीची साताऱ्यात बैठक झाली. या बैठकीस शिवेंद्रसिंहराजेंसह रामराजे ना. निंबाळकर, मंत्री मकरंद पाटील, खा. नितीन पाटील, आ. धैर्यशील कदम आदी उपस्थित होते. या बैठकीस पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या अनुपस्थितीबाबत ना. भोसले म्हणाले, मंत्री मकरंद पाटील यांच्याशी रविवारी याबाबत चर्चा झाली होती. मात्र पालकमंत्री मुंबईला असल्याने बैठकीला ते येवू शकले नसल्याचे मकरंद पाटील यांनी सांगितले. महायुती एकसंघ राहण्यासाठी आमचा प्रयत्न राहील, असेही ना. भोसले यांनी स्पष्ट केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पराभवाचे खापर आयोगावर फोडण्याऐवजी आत्मपरीक्षण करा; शिवेंद्रराजे भोसले यांचा राहुल गांधींवर निशाणा; काँग्रेसच्या भूमिकेवर टीका
पुढील बातमी
खंडाळा तालुक्यात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू; शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी करून घेण्याचे तहसीलदार रविराज जाधव यांचे आवाहन

संबंधित बातम्या