कराड : उच्च शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून सातारा जिल्ह्यातील कराडपासून सातासमुद्रापार अमेरिकेत गेलेल्या नीलम तानाजी शिंदे या तरुणीची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. गेल्या एक वर्ष २७ दिवसांपासून कोमात असलेल्या नीलमने २८ मार्च २०२६ रोजी अमेरिकेतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. नियतीच्या या आघातामुळे कराड तालुक्यातील वडगाव-उंब्रज परिसरात शोककळा पसरली आहे.
नीलम शिंदे या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे वास्तव्यास होत्या. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना एका भरधाव वाहनाने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली होती. या भीषण अपघातात नीलम यांच्या मेंदूला गंभीर इजा झाली होती. अपघाताच्या दिवसापासूनच त्या बेशुद्धावस्थेत होत्या. त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करून तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र, दीर्घकाळ उपचार करूनही त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होऊ शकली नाही. अखेर तेरा महिन्यांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर त्यांची प्राणज्योत मालवली.
या दुर्दैवी घटनेत शिंदे परिवाराला अनेक संकटांचा सामना करावा लागला. अपघाताची माहिती मिळताच वडील तानाजी शिंदे आणि मामा संजय कदम यांनी अमेरिकेला जाण्यासाठी व्हिसा मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. सुरुवातीला तांत्रिक अडचणी आल्यानंतर अखेर त्यांना अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली होती. मात्र, सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या विमान प्रवासाच्या अडचणींमुळे नीलम यांच्या अंतिम संस्कारासाठी त्यांच्या वडिलांना कराडमधून पुन्हा अमेरिकेला जाणे शक्य झाले नाही. ७ एप्रिल २०२६ रोजी अमेरिकेतील 'माऊंट व्हेमन मेमोरियल पार्क' येथे दुपारी १ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडणार असून, यावेळी अमेरिकेत स्थायिक असलेली त्यांची आत्या उपस्थित राहणार आहे.
आपल्या लाडक्या लेकीच्या निधनाचे अतीव दुःख असतानाही शिंदे कुटुंबाने समाजात एक आदर्श घालून दिला आहे. नीलम यांच्या निधनानंतर त्यांचे अवयव दान करण्याचा उदात्त निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांचे डोळे आणि त्वचा दान करण्यात आली आहे. आपल्या मुलीच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी असली, तरी तिच्या अवयवदानामुळे अन्य व्यक्तींना नवजीवन मिळेल, हीच भावना शिंदे कुटुंबाने व्यक्त केली आहे. एका जिद्दी आणि स्वप्नवेड्या तरुणीचा असा अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.