अदानींच्या तारळी प्रकल्पातील नियमबाह्य काम सात दिवसांत थांबवावे अन्यथा पुण्यात मोर्चा - अभिनेते सयाजी शिंदेंचा इशारा

by Team Satara Today | published on : 25 November 2026


सातारा : पाटण तालुक्यातील तारळी धरण परिसरात सुरू असलेल्‍या अदानी समूहाच्‍या तारळे पंप स्‍टोरेज प्रकल्‍पात गंभीर अनियमितता झाली आहे. त्‍यामुळे सात दिवसांत प्रकल्पातील नियमबाह्य काम थांबवावे, उत्खननाचे अधिकृत मोजमाप करून शासनाची थकबाकी वसूल करावी आणि जबाबदारांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज केली. सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्री. शिंदे म्हणाले, ‘‘विकासाच्या नावाखाली पर्यावरणीय नियम आणि महसुली कायद्यांना हरताळ फासला जात असेल, तर त्याची किंमत शासन आणि स्थानिक जनतेने का मोजायची? तारळे प्रकल्पासाठी आवश्यक पर्यावरणीय परवानग्यांमधील अटींचे पालन झालेले नाही, तसेच दगड, मुरूम आणि जांभा दगडाचे मोठ्या प्रमाणावर विनापरवाना उत्खनन करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. स्वामित्वधन, दंड आणि अन्य शासकीय देणी अद्याप वसूल झालेली नसल्याचे कायदेशीर नोटिशीत नमूद आहे. या प्रकरणाचे गांभीर्य केवळ आर्थिक व्यवहारांपुरते मर्यादित नसून पर्यावरणीय परवानग्यांच्या अंमलबजावणीचाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
वन विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कथित उल्लंघनांवर अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. तक्रारी आणि कागदोपत्री पुरावे सादर करूनही प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने हा विषय आता कायदेशीर पातळीवर नेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांमार्फत संबंधित अधिकाऱ्यांना जाहीर नोटीस बजावण्यात आली आहे.
प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक जबाबदारीचा मुद्दाही न्यायालयात उपस्थित करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे तारळी प्रकल्पाच्या निमित्ताने शासनाचा महसूल, पर्यावरणीय नियम आणि प्रशासकीय उत्तरदायित्व या तीन मुद्द्यांवर मोठा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे आहेत, असेही श्री. शिंदे यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एका महिलेशी बोलत असल्‍याच्‍या रागातून दोघांवर कोयत्‍याने वार; पाच जणांवर सातारा तालुका पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल
पुढील बातमी
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रीतिसंगमावरील भेटीची राजकीय वर्तुळात विशेष चर्चा; समाधीस्थळी अभिवादन

संबंधित बातम्या