सातारा : आदल्या दिवशी झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. त्यानंतर दोन व्यक्तींनी बंदुका घेऊन येत माजी लष्करी जवानासह त्याच्या मित्राच्या डोक्याला बंदूक लावून गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार फडतरवाडीतील श्री आत्मगजानन अॅकॅडमी परिसरात घडला.
पोलिसांच्या माहितीनुसार, १६ सप्टेंबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास पांडुरंग डंबाळे याने निलेश कणसे यांना शिवीगाळ व दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर पांडुरंगचे वडील दत्तात्रय व आप्पासाहेब डंबाळे, निखिल कदम तसेच अॅकॅडमीतील पाच-सहा विद्यार्थ्यांनी निलेश कणसे आणि त्यांचे मित्र सचिन कणसे यांना मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
याचदरम्यान दोन अनोळखी व्यक्ती बंदुका घेऊन घटनास्थळी आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यांनी दोघांच्या डोक्याला बंदूक लावत गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. यातील एका व्यक्तीने कुकरीच्या दांड्याने निलेश कणसे यांच्या कानावर मारल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी पांडुरंग, दत्तात्रय आणि आप्पासाहेब डंबाळे यांच्यासह अन्य संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एपीआय काटकर तपास करीत आहेत.
किरकोळ वादातून थेट बंदुकीचा धाक; दोघांना गोळ्या घालण्याची धमकी
by Team Satara Today | published on : 18 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा