ठाणे : जिल्ह्यातील मुंब्रा परिसर पूर्णपणे हिरवा रंगवणार अशी टिप्पणी केल्याप्रकरणी एआयएमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेवक सहर शेख यांना पोलिसांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता (बीएनएसएस) अंतर्गत नोटीस बजावली आहे.
ठाणे महानगरपालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक ३० मधून विजयी झाल्यानंतर नगरसेविका सहर शेख यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या भाषणात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करत पुढील पाच वर्षांत मुंब्रा पूर्णपणे हिरवा रंगवण्याचा मानस असल्याचे म्हटले होते. पुढील पाच वर्षांत मुंब्रामधील प्रत्येक उमेदवार एआयएमआयएमचा असेल, असेही त्या म्हणाल्या होत्या.
या वक्तव्यावर आक्षेप घेत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीत या विधानांना चिथावणीखोर आणि जातीय तणाव निर्माण करणारे ठरवत कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली. मुंब्रा हे महाराष्ट्राचा भाग असून येथे अशा प्रकारची भाषणे स्वीकारली जाणार नाहीत, असेही पत्रात नमूद करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मुंब्रा पोलिसांनी शेख यांना नोटीस बजावत सार्वजनिक भाषण करताना संयम बाळगण्याचा आणि समाजात तेढ निर्माण होईल अशी विधाने टाळण्याचा इशारा दिला आहे. ही नोटीस प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
वक्तव्याचा गैरअर्थ
नगरसेविका सहर शेख यांनी आपल्या वक्तव्याचा गैरअर्थ काढल्याचा आरोप केला असून राजकीय फायद्यासाठी त्यांचे शब्द जाणूनबुजून विकृत केल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या मते, हे विधान केवळ पक्षाचा राजकीय प्रभाव वाढवण्याच्या आशयाने होते. ठाणे महानगरपालिका निवडणुकीत असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वाखालील एआयएमआयएमने पाच जागा जिंकत लक्षणीय कामगिरी केली असून, अनेक प्रस्थापित पक्षांना मागे टाकले आहे.