सदरबाजारात कोयना सोसायटीजवळ उभ्या ट्रकला भीषण आग; लाखोंचे नुकसान

by Team Satara Today | published on : 05 February 2026


सातारा :  सदरबाजार परिसरातील कोयना सोसायटीजवळ उभ्या असलेल्या (एम.एच. ११ सी.एच.५२९५) या ट्रकला गुरुवारी दि.५ रोजी रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत ट्रकसह त्यामधील सर्व साहित्य जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

हा ट्रक लक्ष्मीटेकडी येथील लोखंडी पुलानजीक उभा होता. सुरेश दंडगुले यांचा हा ट्रक असून, कोंबड्यांचे खाद्य तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल ट्रकमध्ये ठेवण्यात आला होता. आग लागल्याचे निदर्शनास येताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ पालिकेच्या अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मात्र तोपर्यंत ट्रकमधील सर्व साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.या आगीमागे घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत असून, ट्रक विद्युत वाहक तारांच्या खाली उभा असल्याने शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाजही वर्तवण्यात येत आहे. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जन्म-मृत्यू दाखल्यासाठी हेलपाटे टळणार; प्रायोगिक तत्त्वावर होणार दोन उपकेंद्रे : अ‍ॅड. डी. जी. बनकर
पुढील बातमी
मतदान केंद्राजवळचे आठवडी बाजार 7 फेब्रुवारी रोजी बंद - जिल्हाधिकारी संतोष पाटील

संबंधित बातम्या