कराड : छत्तीसगडमध्ये निवडून आल्यावर तिथे ईव्हीएम घोटाळा झाला नाही? लोकसभेला आमच्या झालेल्या पराभवावेळी ईव्हीएम घोटाळा झाला नाही? आम्हाला बहुमत मिळाले म्हणून विरोधकांनी ईव्हीएमवर खापर फोडू नये, असे सांगत, लोकसभेच्या पराभवातून धडा घेत आम्ही काम केले. जनतेपर्यंत अनेक योजना पोहोचवल्या. त्यामुळे महायुतीला हे यश मिळाले असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त कराड येथील प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी आ. हसन मुश्रीफ, आ. मकरंद पाटील उपस्थित होते. ना. पवार म्हणाले, महाराष्ट्राचा पाया रचण्याचे काम यशवंतराव चव्हाण यांनी केले. यामुळे महाराष्ट्र कदापि त्यांना विसरणार नाही. शिव, शाहू, फुले, आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारानेच आम्ही पुढे जाण्याचे काम चालू ठेवणार आहे. यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेल्या दिशेने मार्गाने आपण सर्वांनी पुढे जाणे गरजेचे आहे. त्यांच्या विचारांने आम्ही महाराष्ट्र पुढे नेण्यासाठी एका विचाराने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
ते म्हणाले, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार अशी स्थिती नाही. आम्ही आजच तिघे एकत्र बसून स्थिर सरकार देऊ. आमच्याकडे बहुमत आहे. विरोधी पक्ष नेता होण्यासाठी लागणारे संख्याबळ विरोधकांकडे नाही. मात्र, विरोधकांचा मानसन्मान ठेवण्याची पद्धत आम्ही कायम ठेवू. त्यांनी मांडलेल्या प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. सगळयांना विश्वासात घेऊन आम्ही काम करणार आहोत. राज्य सर्व क्षेत्रावर आघाडीवर कसे राहील, ही परंपरा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करू कमी पडणार नाही.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी तुमचंही नाव चर्चेत आहे? या प्रश्नावर ते म्हणाले, मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी बसून जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ. मुख्यमंत्रीपदावर सरकारचा कोणताच फॉर्म्युला अजून तरी ठरलेला नाही. राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने माझी नेता म्हणून निवड झाली असून सर्व अधिकार मला दिले आहेत. एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचा नेता म्हणून निवड झाली आहे. आता भाजपने नेते निवड कुणाची करायची ते ठरवतील. आम्ही तिघंही नंतर एकत्र बसू. आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करू. राज्याला मजबूत, स्थिर सरकार देऊ, असे त्यांनी सांगितले.
बारामतीतील लढतीबाबत ते म्हणाले, युगेंद्र हा व्यावसायिक असून त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही.