क्रांतिपर्व च्या माध्यमातून क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जीवनपट प्रेक्षकांच्या भेटीला

चित्रपटात साकारला 1930 पासूनचा घटनाक्रम; सातारमध्ये झाले चित्रपटाच्या पोस्टरचे प्रदर्शन

by Team Satara Today | published on : 03 August 2025


सातारा : क्रांतिसिंह नाना पाटील यांनी क्रांतिची सुरुवात सातार्‍यातून करुन ब्रिटीशांना सळो की पळो करुन देशातील पहिले स्वातंत्र्य सातार्‍याला मिळवून दिले. त्या पत्रीसरकारच्या चळवळीचे प्रणेते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनावर आजपर्यंत अनेक लेखन झाले, पुस्तके झाली. परंतु चित्रपट असा तयार झालेला नव्हता. तो ‘क्रांतिपर्व’च्या रुपाने चित्रीत करण्यात आलेला आहे. त्यासाठी त्यांच्यावर लिखीत असलेले लिखित साहित्य, त्यांनी ज्या-ज्या ठिकाणी भेटी दिल्या त्या ठिकाणचा अभ्यास करुन हा चित्रपट साकारण्यात आला आहे. तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रेक्षकांनीही सिनेमाघरात जावून या उत्कृष्ठ कलाकृतीचा आनंद घ्यावा, असे आवाहन ‘क्रांतिपर्व’चे निर्माते विशाल जाधव यांनी केले आहे.

सातारा पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित क्रांतिपर्व पोस्टरच्या प्रदर्शनावेळी ते बोलत होते. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक मनिष अनुसरकर, सामाजिक कार्यकर्ते अभिमन्यू पाटील, कलाकार सिद्धार्थ बद्दी, रश्मी साळवी, अनुराधा धामणे, तृप्ती शेडगे, श्वेता वाघ, पंकज काळे, अनिल राबाडे आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना अभिमन्यू पाटील म्हणाले, या चित्रपटाबाबत मला जेव्हा सांगण्यात आले, तेव्हा मी त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले. जे-जे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याबाबत मला ज्ञात होते ते मी त्यांना दाखवले. त्यांना सहकार्य केले. हा चित्रपट एक चांगली निर्मिती आहे. या चित्रपटाची निर्मिती सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातून झाली आहे. आज क्रांतिसिंह नाना पाटील यांची 125 वी जयंती. त्यामुळे क्रांतिपर्व या चित्रपटाचे पोस्टर लाचिंग क्रांतिच्या या जिल्ह्यातून करत आहे. आजपर्यंत क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यावर खूप लेखन झाले आहे. त्यामधून ते दिसले होते. मात्र, आता चित्रपटाच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांनी एक चळवळ उभी केली. ती पत्री सरकार चळवळ याच सातारा जिह्यातून सुरू केली होती. ती चळवळ पुन्हा जीवंतपणे साकारली गेली आहे. चित्रपटात बारकावे त्या काळातले घेण्यात आले आहेत. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जीवनपट दोन सव्वा दोन तासात बसवू शकत नाही. परंतु तो बसवण्याचा प्रयत्न केला आहे. हुबेहूबपणे क्रांतिसिंह नाना पाटील, जी.डी. लाड साकारले गेले आहेत. कलाकारांमध्येही क्रांतीची धग दिसून येत आहे. लिहणं सोपं असतं, पण ते अभिनयातून लोकांसमोर आणणे अवघड असते. या चित्रपटातील लेख, कलाकार हे आपल्या भागातील, आपल्या मातीतले आहेत. सामान्य घरातील आहेत, असे त्यांनी सांगितले. 

विशाल जाधव म्हणाले, आजच्या पिढीला क्रांतिकारकांचे बलिदान देशासाठी किती महत्वाचे होते हे माहिती पडले पाहिजे. त्यांनी जो इतिहास घडवला, तो चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही समोर आणतो आहोत. चित्रपटाची स्क्रीप्ट वाचली आणि लगेच निर्मितीकरता होकार दिला. चित्रपट चांगल्या दर्जाचा साकारण्यात आला आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे पात्र हुबेहूब साकारलेलं आहे. महिला कलाकारांनीही इतिहास जागृत केला आहे. प्रेक्षकांनी आवर्जून या चित्रपटाचा आनंद घेवून आपला इतिहास समजून घ्यावा. हा चित्रपट परिवारातील सर्वांनी एकत्र सिनेमाघरात जावून पहावा, असे आवाहन त्यांनी केले. 

दिग्दर्शक मनीष अनुसरकर यांनी सांगितले, प्रत्येक क्रांतिकारकांचे जीवन म्हणजे एक कादंबरीच आहे. हा चित्रपट साकारताना क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनावरील अनेक संदर्भग्रंथ चाळले, अभ्यास केला, म्हणून अनेक दुवे जोडता आले. 1930 पासून घटना जोडता आल्या. क्रोना लॉजी तयार करता आणि त्या काळात चित्रपट घेवून जाण्याचा प्रयत्न केला आहे, असे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, क्रांतिसिंह नाना पाटील यांची भूमिका साकारलेले अनिल राबाडे यांनीही मलाच माहिती नव्हते की मी क्रांतिसिंहासारखा दिसतो. माझं कास्टिंग झालं तेव्हा मला कळले. संवादही अभ्यासूनच केले आहेत, असे त्यांनी सांगितले. या चित्रपटात दोन गाणी आहेत, पोवाडाही आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारमध्ये मराठी बालनाट्य दिवस उत्साहात साजरा...
पुढील बातमी
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी सह चारचाकी चालका विरोधात गुन्हा

संबंधित बातम्या