सातारा : सातारा शहराच्या विकासासाठी पूर्वी कधीही मिळाला नाही एवढा निधी भाजप सरकारच्या माध्यमातून मिळाला आहे. आगामी काळातही सातारा शहरातील सर्व प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजपच सरकारच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध केला जाईल. शहराचा कायापालट करण्यासाठी नगराध्यक्ष पदासह भाजपचे नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार विजयी करा, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
सातारा नगर पालिकेच्या निवडणुकीनिमित्त भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते, नगरसेवक पदाचे उमदेवार जयवंत भोसले व सौ. स्मिता घोडके यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्र. १४ मध्ये ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या उपस्थितीत पदयात्रा काढण्यात आली. याप्रसंगी ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी मतदारांशी संवाद साधला. प्रभागात ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पदयात्रेचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.
आपल्या सातारा शहराचा विकास कोणी केला, सातारकरांचे प्रश्न कोणी सोडवले, तुमच्यासोबत कायम कोण असतं, याचा विचार करून प्रत्येक सातारकर मतदाराने भाजपच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. आपल्या शहराचा विकासात्मक कायापालट करण्यासाठी एक सजग मतदार म्हणून आपण सर्वांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मतांनी विजयी करावे, असे आवाहन ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले.
विरोधकांना कसलाही जनाधार नाही
विरोधकांना कसलाही जनाधार नाही. त्यांच्याकडे सातारा शहराचे कसलेही व्हिजन नाही. निवडणुकीपुरते उगवणाऱ्या विरोधकांनी आजवर सातारा शहरासाठी काय केले? निवडणुकीच्या निमित्ताने केवळ मते मागण्यासाठी येणाऱ्यांना सातारकरांनी जाब विचारला पाहिजे., असे ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले.