सातारा राज्याचे पर्यटन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून पाटण तालुक्यातील तारळे (धनगरवाडी) या गावांमध्ये आदिवासी कल्याणकारी दूरदर्शी उपक्रमांतर्गत कातकरी बांधवांना 48 गृहप्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. प्रधानमंत्री जनजाती आदिवासी अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत असून या प्रकल्पाचे लोकमान्य बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांच्या हस्ते नुकतेच भूमिपूजन करण्यात आले.
या सोहळ्याला मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, पाटणच्या गटविकास अधिकारी सरिता पवार, पाटणचे सहाय्यक गटविकास अधिकारी वसंत धनवडे, तारळेचे सरपंच प्रकाश जाधव व उपसरपंच सुधा पवेकर उपस्थित होते.
तारळे (धनगरवाडी) येथे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये कातकरी समाजासाठी 48 घरकुले मंजूर करण्यात आली असून या घरकुलांच्या खरेदीसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेतून संबंधित लाभार्थी यांना जागा खरेदीसाठी निधी वितरित करण्यात आला. येथील कातकरी बांधवांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन प्राथमिक चर्चा केली होती. देसाई यांनी शासनाकडे पाठपुरावा करून गावात 48 गृहप्रकल्पांसाठी जागा उपलब्ध करून घेतली. यांतर्गत 37 लाभार्थ्यांना एक गुंठा, तर दहा लाभार्थ्यांना अर्धा गुंठा जागा खरेदी दिली जाणार आहे. अर्धा गुंठा जागा खरेदीसाठी 58 हजार रुपये अनुदान देण्यात आले असून बांधकामासाठी दोन लाख, रोजगार हमी कृती संगम उपक्रमांतर्गत 28 हजार, तर शौचालय बांधकामासाठी 12 हजार, असे 2 लाख 40 हजार 28 रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे.
चौकट
ना. शंभूराज देसाई यांचा यशस्वी पाठपुरावा
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यामुळे कातकरी बांधवांच्या हक्काचा गृह प्रकल्प सत्यात उतरत आहे याचा मनस्वी आनंद आहे, असे मत यशराज देसाई यांनी व्यक्त करत घरकुलांची कामे दर्जेदार होऊन ती प्रमाणित कालावधीमध्ये पूर्णत्वाला जावीत, अशी विनंती संबंधित यंत्रणेला केली