सातारा : सातारा- सोलापूर या महामार्गावर असणाऱ्या सातारा शहरातील जिल्हा परिषद चौकातील ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा पुन्हा एकदा बंद अवस्थेत पडल्यामुळे या चौकातून पायी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. या चौकात असणारा ट्रॅफिक सिग्नल केवळ शोपीस झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाला 'कितींदा आठवावे तुला' अशी म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.
सातारा शहरातील जिल्हा परिषद चौक हा अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. या चौक परिसरात जिल्हा परिषद कार्यालय, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची मुख्य इमारत, नामवंत रुग्णालये, प्रख्यात अण्णासाहेब कल्याणी हायस्कूल विद्यालय, छत्रपती शिवाजी महाविद्यालय, अनेक बँकांची एटीएम सेंटर, रिलायन्स मॉल यासारखी महत्त्वाची ठिकाणे आहेत. त्यामुळे सकाळी सहा वाजल्यापासूनच या परिसरात नागरिकांची मोठी गर्दी असते. सदरबझार परिसरातील अनेक विद्यार्थी अण्णासाहेब कल्याणी विद्यालयात शिक्षण घेत असतात. त्यांना जिल्हा परिषद चौकातूनच जा-ये करावी लागते. विशेष म्हणजे हा मार्ग ओलांडून ये-जा करावी लागते. त्यामुळे हा चौक वर्दळीचा समजला जातो. सुमारे दहा वर्षांपूर्वी सातारा नगरपालिका आणि शहर वाहतूक शाखा यांच्या माध्यमातून या चौकामध्ये ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. सुरुवातीला काही महिने येथील ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा नियमितपणे सुरू होती, नंतर मात्र नव्याचे न ऊ दिवस असे म्हणत ही यंत्रणा कधी सुरू तर कधी बंद असल्यामुळे याचा पायी प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दोन्हीकडची वाहने पाहूनच हा मार्ग जीव टांगणीला लावत अनेक जण ओलांडत असल्याचे पाहायला मिळत आहे.
सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत शहराच्या विकासाच्या गप्पा फार मोठ्या प्रमाणावर झोडल्या गेल्या असल्या तरी शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेवर कोणीही भाष्य केले नाही. सातारा शहरातील बंद असणारी ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा, वाहनतळ असे अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या प्रश्नांचा उहापोह केव्हा होणार असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.