दहीवडी : मी बारामतीला मुजरा करत नाही, म्हणूनच विरोधक एक होऊन माझा द्वेष करतात. माझी लढाई मतदारसंघात विविध योजनांचे पाणी आणून दुष्काळमुक्तीची आहे. माझ्या कामात अडथळे आणून पाणी देण्याला विरोध करणार्यांविरोधात मी कायमच लढलो आहे. माझा मतदारसंघ दुष्काळमुक्त होईपर्यंत ही लढाई सुरूच राहील, असे प्रतिपादन आ. जयकुमार यांनी केले.
माण तालुक्यातील माता-भगिनींच्या सन्मानार्थ दहीवडी येथे भाजपतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमात आ. गोरे यांनी प्रवेश करताच हजारो भगिनींनी गोरे भाऊंना राख्या बांधल्या. यावेळी माजी आ. दिलीपराव येळगावकर, भगवानराव गोरे, अंकुशभाऊ गोरे, सोनिया गोरे, सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे, दहीवडी नगरपंचायतीचे पदाधिकारी, भाजपच्या महिला पदाधिकारी आणि माता-भगिनी विक्रमी संख्येने उपस्थित होत्या.
आ. गोरे पुढे म्हणाले, पाणीच नाही तर देणार कुठून, असे शरद पवार म्हणायचे. पाणीच नव्हते तर हे इतके पाणी आले कुठून, असा प्रश्नही त्यांनी शरद पवारांना विचारला. पृथ्वीच्या अंतापर्यंत माण-खटावला पाणी येऊ शकत नाही असे म्हणणारे रामराजे जलसंपदा विभागाचे मंत्री होते. त्यांचा अंत व्हायच्या आत माझ्या मतदारसंघात पाणी आले आहे. मी बारामतीला मुजरा घातला असता तर माझा त्रास कमी झाला असता, मात्र तसे केले असते तर माण - खटावमध्ये पाणी आले नसते. आता टेंभू, औंधसह वीस गावे आणि माणमधील वंचित 29 गावांना पाणी देण्याचे आणि एमआयडीसी उभारून युवकांच्या हाताला काम देणार आहे. आगामी तीन वर्षांत उरलेल्या 30 टक्के भागात पाणी पोहोचविणार असल्याचा शब्दही त्यांनी दिला.
अशी गर्दी दुसरीकडे पाहिलीच नाही
लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमानिमित्त मी अनेक ठिकाणी जाते, मात्र दहीवडीसारखी माता-भगिनींची अलोट गर्दी मी कुठेच पाहिली नाही. हजारो बहिणींनी आ. जयकुमार गोरे यांना राख्या बांधल्या आहेत. त्यांनी सर्वांना भाऊबीज देऊन सन्मानितही केले असल्याचे सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी सांगितले.