सातारा : येथील कॉंग्रेसजनांनी पक्षाचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजाबद्दल उपस्थित केलेल्या आक्षेपाचे जोरदार समर्थन केले. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेऊन फडणवीस हे आता महाराष्ट्राचे खलनायक झाले असल्याचे सांगत त्यांच्या निषेधाचा ठराव संमत केला.
येथील कॉंग्रेस भवनातील महात्मा गांधी सभागृहात सोमवारी राहुल गांधी यांच्या दिल्ली येथील पत्रकार परिषदेची ध्वनी चित्रफित दाखवण्यात आली. राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या 10 महत्वपूर्ण मुद्द्यांचे समर्थन करीत असताना जिल्ह्यातील विविध मतदारसंघात मतदार नोंदणीत गैरप्रकारांमुळे निकालावर परिणाम झाल्याच्या भावना अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
निवडणूक वेळापत्रक ठरवून नियंत्रण केले जाणे, महाराष्ट्रात पाच वर्षात जेवढे मतदार नोंदणी झाली आहे तितकी अखेरच्या पाच महिन्यात नोंदवली जाणे, मतदाना दिवशी सायंकाळी पाच नंतर मत टक्यात झालेली वाढ, निवडणूक आयोगाची डिजिटल मतदार यादी देण्यातील टाळाटाळ, पाच नंतरच्या मतदानाचे सीसीटीव्ही फुटेज नष्ट करणे, खोटे पत्ते - नोंदणी, एका छोट्या घरात 80,68 अशा संख्येने मतदार राहणे, अवैध छायाचित्रे वापरणे आदींमुळे निवडणूक आयोगाच्या हेतूबद्दल शंका निर्माण होऊन विद्यमान सरकार आणि आयोग यांनी संगनमताने या गोष्टी घडवून आणल्याच्या राहुल गांधी यांच्या आरोपाला पुष्टीच मिळत असल्याच्या भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
जिल्हाध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी राहुल गांधी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबद्दल आणि निवडणुकीतील गैरप्रकाराबद्दल तीव्र भावना व्यक्त केल्या. राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या या आक्षेपांना देशभरातील सर्व विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळाल्याने या आक्षेपाना बळकटी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.
खंडप्राय देशात राबवली जाणारी निवडणूक प्रक्रिया आणि येथील लोकशाही व्यवस्थेबद्दल आजवर भारत जगाच्या कौतुकास पात्र ठरला असताना अलीकडच्या काळात निवडणूक आयोगाने मात्र आपले स्वायत्त रूप घालून सत्ताधारी सरकारला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी आपल्या तत्त्व नियमांना तिलांजली दिल्याबद्दल बाबुराव शिंदे यांनी तीव्र शब्दात टीका केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्याविरुद्ध बोलताना आक्षेपार्ह शब्द वापरले. निवडणूक आयोगाने केलेल्या गैरप्रकाराबद्दल बोलत असताना मुख्यमंत्री फडणवीस आयोगाच्या वतीने का बोलत आहेत? ते आयोगाचे प्रवक्ते कधीपासून झाले, अशी विचारणा करीत फडणवीस आता महाराष्ट्राचे नायक नसून खलनायक झाल्याचे टीका करीत शिंदे यांनी त्यांच्या निषेधाचा ठराव मांडला गेला. सभेने तो एकमताने संमत केला.
दरम्यान,याप्रसंगी अजित पाटील - चिखलीकर, झाकीर पठाण, बाबासाहेब कदम, जगन्नाथ कुंभार,रफिकभाई बागवान, अन्वर पाशा खान ,रजनी पवार , अल्पना यादव, रझिया शेख, विष्णुपंत अवघडे , नरेश देसाई,अमर करंजे नाजीम इनामदार, आनंदराव जाधव, अविनाश फाळके, डॉ. संतोष कदम, नरेंद्र पाटणकर डॉ.शंकरराव पवार,निवास थोरात ,प्रताप देशमुख, बाबासाहेब माने ,अरबाज शेख , अमरजीत कांबळे, ड. श्रीकांत चव्हाण आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राहुल गांधींच्या भूमिकेचे जिल्हा कॉंग्रेसकडून जोरदार समर्थन
मुख्यमंत्री फडणवीस यांचा निषेध; निवडणूक आयोगाविरुद्ध लढा तीव्र करण्याचा निर्धार
by Team Satara Today | published on : 13 August 2025

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा