सातारा : वाचन संस्कृती तुटत चालली आहे असा कंठशोष संपूर्ण महाराष्ट्र करतो आहे, मात्र सातारा जिल्ह्यात गेल्या अडीच दशकापासून साहित्य सत्संग सुरू आहे. आजच्या तंत्रधिष्ठीत युगामध्ये तरुण इंग्रजी वाचकांना मराठीच्या मांडवात आपल्याला आणायचे आहे. ग्रंथ महोत्सवाचे हक्काचे प्रेक्षक ठरलेले असतात मात्र लोकजागर केल्याशिवाय लोक साहित्य संमेलनाला येत नाहीत. शतकी संमेलनासाठी साताऱ्याचे संमेलन निश्चित पथदर्शक ठरेल या पध्दतीने कार्यक्रमांचे आयोजन करावे लागेल, अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी व्यक्त केली.
साता-यात १ ते ४ जानेवारी २०२६ दरम्यान मसाप, पुणे शाखा शाहूपुरी, मावळा फौंडेशन आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे लोकार्पण विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मसापचे सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकीहाळ, ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ, ग्रंथ महोत्सव संयोजन समितीचे डॉ. राजेंद्र माने, शिरीष चिटणीस, ९९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत, मावळा फाउंडेशनचे ॲड. चंद्रकांत बेबले उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. लवटे पुढे म्हणाले साताऱ्याचा ग्रंथ महोत्सव रौप्य महोत्सव वर्ष साजरे करत आहे, त्यामुळे येथील शब्द सत्संग सातत्याने सुरू आहे. साहित्य संमेलने ही सातारकरांना नवीन नाहीत. एकीकडे साहित्याची नाळ तुटत चालली आहे असा कंठ शोष इतर जिल्हे करत आहेत मात्र सातारा साहित्य सत्संगामध्ये रमला आहे. ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द.फडणीस यांनी बोधचिन्ह अत्यंत चातुर्याने बनवले आहे.तलवारीच्या दुसऱ्या टोकाला त्यांनी पेनाची रचना केली आहे. सातारकरांवर भविष्यात अक्षर दुष्काळ पडणार नाही याची जबाबदारी पेलण्याची वेळ आहे. शंभरव्या साहित्य संमेलनासाठी साताऱ्याचे हे साहित्य संमेलन पथदर्शी ठरावे. केवळ गर्दी जमवून चालणार नाही तर तरुण इंग्रजी वाचकांना मराठीच्या मांडवात आणावे लागेल त्याकरता पुढील शंभर दिवसात सातत्याने लोक जागर करावा लागेल. काळाला धरून चालणारे परिसंवादाचे विषय ठरवावे लागतील. साताऱ्याचे साहित्य संमेलन हे पुढील अनेक भविष्यकालीन संमेलनासाठी पथदर्शी ठरेल या पध्दतीने मांडणी होणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ९९ वे साहित्य संमेलन ही सातारकरांच्या स्वप्नपूर्तीचा क्षण आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी सातारा जिल्ह्याने केलेल्या चळवळी या राष्ट्रीय पातळीवर प्रसिध्द झाल्या आहेत. सातारकर साहित्य संमेलन यशस्वीपणे पार पाडतील अशी मला खात्री आहे. सातारकर एकदा जबाबदारी घेतल्यावर पुन्हा मागे हटत नाहीत. संमेलनातील गर्दीमध्ये दर्दी निश्चितच दिसतील असा आम्हाला विश्वास आहे. साताऱ्याच्या साहित्य संमेलनाने आयोजनापूर्वीच अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत, यामध्ये प्रशासन सुध्दा आमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. हा अक्षर साहित्याचा सामूहिक सोहळा असून तो यशस्वी करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, त्याकरता आपण सज्ज राहूया असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे यांनी केले.
जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले, भौतिक प्रगती म्हणजे विकास नाही. भाषा संस्कृतीचा वारसा पुढील पिढीला संक्रमित होणे म्हणजेच साहित्य चळवळीचा वारसा समृध्द करणे आहे. साहित्य संमेलनाच्या यशस्वितेसाठी सातारा जिल्हा प्रशासन संपूर्णपणे संयोजन समिती बरोबर आहे. वातावरण निर्मितीसाठी सुरुवातीला विद्यार्थी आणि शिक्षक यांचे एखादे विभागीय संमेलन निश्चितपणे घेण्यात यावे.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. संयोजन समितीच्या वतीने व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अधिकृत बोधचिन्हाचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकात विनोद कुलकर्णी यांनी साताऱ्याच्या साहित्य संमेलनाचे प्रस्थापित विक्रमांची माहिती दिली. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठिंबामुळे हे संमेलन साताऱ्यात घेणे शक्य झाले. उत्स्फूर्त गर्दीचा विक्रम यंदाच्या साताऱ्याच्या संमेलनात मोडला जाईल, असा विश्वास व्यक्त केला. मसपाचे सातारा जिल्हा प्रतिनिधी रविंद्र बेडकीहाळ यांनीही मनोगत व्यक्त करताना फलटणमधील संस्थांकडून एक लाख रुपयांचा निधी जाहीर केला त्यापैकी २८ हजार रुपये यावेळी सुपूर्द केले. समता पतसंस्था, कोपरगाव यांच्यामार्फत चेअरमन काका कोयटे यांनी एक लाख रुपये देणगीचा निधी जाहीर केला. सहवास महिला मंडळाच्या ज्येष्ठ महिलांनी साहित्य संमेलनाला दहा हजार रुपयांची देणगी दिली. सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले. आभार नंदकुमार सावंत यांनी मानले. यावेळी वजीर नदाफ, सचिन सावंत, अमर बेंद्रे, आर.डी.पाटील, तुषार महामुलकर, अशोक मोने, प्रकाश गवळी, अमोल मोहिते, अनिल जठार, रवि माने, साईराज भोसले, डॉ.संदीप श्रोत्री तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यप्रेमी सातारकर उपस्थित होते.