साताऱ्यातील पत्रकारांची बदनामी करणाऱ्या संदीप जाधववर कारवाई करा; विविध मीडिया प्रतिनिधींचे अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन

by Team Satara Today | published on : 24 July 2026


सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाच्या नावाखाली स्थानिक पत्रकार व नामांकित प्रसारमाध्यमांविरुद्ध जाणीवपूर्वक बिनबुडाचे आरोप करणाऱ्या संदीप जाधव या आंदोलकावर कडक फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी सातारा जिल्ह्यातील सर्व इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि डिजिटल मीडिया प्रतिनिधींच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

​गेल्या तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनास बसलेल्या संदीप जाधव याच्याकडून पत्रकारिता क्षेत्राची नाहक बदनामी केली जात आहे. आटाळी येथील गट क्रमांक ३४७ मधील कथित २३२ ब्रास उत्खनन प्रकरणाचा वारंवार उल्लेख आंदोलकाकडून केला जात असला, तरी या प्रकरणाचा सक्षम महसूल प्राधिकरणाद्वारे कायद्यानुसार यापूर्वीच योग्य तो निपटारा झालेला आहे. वस्तुस्थिती स्पष्ट असतानाही केवळ जुन्या पंचनाम्याचा चुकीचा आधार घेऊन बदनामीच्या दुष्ट हेतूने खोटी माहिती पसरवली जात आहे. याद्वारे तुषार तपासे आणि ओंकार कदम या पत्रकारांची सामाजिक व व्यावसायिक प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

​या आंदोलनादरम्यान 'झी मीडिया', 'सकाळ समूह' तसेच त्यांच्या संपादकांची नावे विनाकारण घेऊन निराधार आरोप केले जात आहेत. या प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी व दबाव आणण्यासाठी माध्यम संस्थांची सार्वजनिकरीत्या बदनामी केली जात आहे.

​त्यामुळे आंदोलकाद्वारे करण्यात आलेल्या वक्तव्यांची व भाषणांची तातडीने चौकशी करून भारतीय न्याय संहितेतील (BNS) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रतिनिधींनी केली आहे. तसेच भविष्यात कोणत्याही पत्रकार किंवा माध्यम संस्थेची पुराव्याशिवाय बदनामी होऊ नये म्हणून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे. स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणवून घेणाऱ्या या आंदोलकाच्या मागे नेमका कोणाचा हात किंवा 'मास्टरमाइंड' आहे, याचाही शोध पोलिसांनी घ्यावा असा सूर पत्रकार वर्गातून उमटत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी रघुनाथ बाबर, उपाध्यक्षपदी डॉ.रमाकांत साठे
पुढील बातमी
फलटणमध्ये भीषण कार अपघात ; कमिन्स कंपनीतील तीन कामगारांचा मृत्यू, तीन जखमी

संबंधित बातम्या