साताऱ्यात उद्धवसेना-मनसेची निवडणूक एकत्र लढवण्याची घोषणा; राजकीय फटाके फुटणार , लढत तिरंगी होणार की चौरंगी?

by Team Satara Today | published on : 25 October 2025


सातारा : एकीकडे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची जोरदार चर्चा सुरू असताना दुसरीकडे राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या सातारा पालिकेसाठी उद्धवसेना व मनसेने संयुक्त बैठक घेत पालिका निवडणूक लढवण्याची घोषणा करून टाकली. या दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी ऐन दिवाळीत घेतलेल्या या निर्णयामुळे आता येत्या काही दिवसांत राजकीय फटाके फुटणार असल्याचे निश्चित झाले आहे.

साताऱ्यातील पोवई नाका येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीला अभिवादन करून उद्धवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नगरपालिका निवडणूक एकत्र लढवण्याची महत्त्वपूर्ण घोषणा गुरुवारी केली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही युती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे, अशी माहिती मनसेचे सातारा शहराध्यक्ष राहुल पवार, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे आणि शहर संघटक प्रणव सावंत यांनी दिली.

सातारा शहरातील नागरिकांच्या मूलभूत समस्या आणि अडचणींवर शिवसेना-मनसेकडून नेहमीच आवाज उठवला जात आहे. याच जनहिताच्या उद्देशाने दोन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र आले. सातारकर नागरिक कायम आमच्या पाठीशी राहतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी श्रीकांत पवार, भरत रावळ, गणेश अहिवळे, रविराज बडदरे, रोहित जाधव, सुमित नाईक, शिवाजीराव इंगवले, प्रशांत सोडमिसे, संदीप धुढळे, ओंकार साळुंखे, मनोहर चव्हाण, इम्रान शेख, नयन साळुंखे, प्रदीप सावखंडे, आशुतोष पारंगे, ओमकार शिंदे यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राजकीय समीकरणे बदलणार?

येत्या काळात सातारा नगरपालिकेची निवडणूक होत आहे. सध्या या निवडणुकीसाठी खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील दोन आघाड्या सक्रिय आहेत. त्यातच आता उद्धवसेना आणि मनसेमुळे निवडणुकीच्या मैदानात आणखी एका प्रबळ शक्तीचा प्रवेश झाला आहे. या नव्या युतीमुळे साताऱ्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात. आगामी काळात ही लढत तिरंगी होणार की चौरंगी? या नव्या युतीचा सत्तेच्या समीकरणांवर कसा व कितपत परिणाम होताे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
‘महाराष्ट्राचे‘मिनी काश्मीर’ तापोळा पर्यटकांनी गजबजले; तापोळा सध्या पर्यटनाचे प्रमुख आकर्षण
पुढील बातमी
बकरी कापण्याच्या कारणावरुन कुटुंबाला चोप; भावेनगर, ता. कोरेगाव येथील घटना

संबंधित बातम्या