‘यहा के हम सिकंदर’ कुळकजाईचे मैदान शेखने मारले; पंजाब केसरी अमित कुमारवर ‘एकचाक’ डावाने मात

by Team Satara Today | published on : 14 April 2026


दहिवडी : माण तालुक्यातील कुळकजाई येथे श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य कुस्ती मैदानात महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याने आपल्या कौशल्याचा जबरदस्त प्रत्यय घडवून आणला. त्याने पंजाब केसरी अमित कुमार याला अवघ्या १२ मिनिटांत ‘एकचाक’ डावावर चितपट करत या मैदानाचा निकाल आपल्या बाजूने लावला. या रोमहर्षक कुस्तीने मैदानात उपस्थित असलेल्या हजारो कुस्तीप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

​या कुस्ती मैदानातील प्रथम क्रमांकाच्या लढतीसाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शेखर गोरे यांच्या वतीने ३ लाख ५१ हजार रुपयांचे इनाम ठेवण्यात आले होते. त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. कुस्तीला सुरुवात होताच सिकंदर शेख आणि अमित कुमार या दोन्ही मल्लांनी एकमेकांचा अंदाज घेत आक्रमक पवित्र घेतला. मात्र, सिकंदरने आपल्या चपळतेचा आणि ताकदीचा अचूक वापर करत अमित कुमारवर पकड मिळवली आणि ‘एकचाक’ डावावर त्याला माती दाखवली. सिकंदरच्या या विजयानंतर कुस्ती शौकिनांनी मैदानात एकच जल्लोष केला.

​मैदानातील दुसऱ्या क्रमांकाच्या लढतीत आटपाडीच्या सचिन काळे याने पुण्याच्या रामा कांबळेवर ‘कलाजंग’ डावाचा प्रभावी वापर करून विजय संपादन केला. इतर महत्त्वाच्या लढतींमध्ये कुंदन पोतेकर याने सुदर्शन आलदरवर मात केली, तर प्रज्योत कचरे याने रुद्र माने याच्यावर विजय मिळवत आपली सरशी सिद्ध केली.

​या कुस्ती महोत्सवासाठी जिल्हा परिषद सदस्य संदीप मांडवे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते बापू लोखंडे, नामदेव बोडरे, उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत, ऑल इंडिया चॅम्पियन विकास गुंडगे, महाराष्ट्र चॅम्पियन जयदीप गायकवाड आणि कर्नाटक केसरी कांता तरंगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. हलगीचा कडकडाट, मल्लांनी ठोकलेले शड्डू आणि प्रा. राजेंद्र जगदाळे यांच्या बहारदार निवेदनाने कुस्ती शौकिनांमध्ये मोठा उत्साह निर्माण केला होता. कुळकजाई येथील ग्रामस्थ, यात्रा कमिटी आणि कुस्ती प्रेमींनी या मैदाचे अत्यंत नेटके नियोजन केले होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अकोल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर खंडणीचा गुन्हा
पुढील बातमी
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमासह लॉज मालकास बेड्या; कराड पोलिसांची मोठी कारवाई

संबंधित बातम्या