सातारा : सातार्यातील संतधार पावसाने धोम, बलकवडी व कण्हेर, उरमोडी धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे धरणातून नदीपात्रात मोठा विसर्ग सोडण्यात आला आहे. कृष्णा व वेण्णा, उरमोडी नदी पात्रात पाणी सोडल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत. वाईला महागणपती मंदिरात पाणी घुसले आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सातार्याच्या पश्चिम भागात सुरू असणार्या मुसळधार पावसामुळे धोम, कण्हेर व बलकवडी या धरणांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ होत आहे. यामुळे या धरणातून कृष्णा व वेण्णा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. नदी काठावरील लोकांना नदीपात्रात उतरण्यास व इतर कामे करण्यास सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
धोम धरण सद्यस्थितीमध्ये 90.23 टक्के भरलेले आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस चालू असून धरणामध्ये मोठी आवक होत आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्याकरिता सद्यस्थितीत नदीपात्रामध्ये सांडव्यावरून सात हजार क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. धोम बलकवडी धरण 86.39 टक्के भरलेले आहे. त्यामुळे धरणातून 3242 क्युसेक्स पाणी कृष्णा नदीपात्रातून सोडण्यात आले आहे. धोम बलकवडी धरणातून सोडलेले पाणी नदीपात्रातून येत असल्याने धोम धरणाची पाणी पातळी वाढली आहे. कण्हेर धरणाची पाणी पातळी वाढल्याने आज दुपारपासून पाच हजार पाचशे पन्नास पाणी वेण्णा नदी पात्रात सोडण्यात आले आहे.
उरमोडी धरणातून नदीपात्रात पाचशे क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे.
धरणातून पाणी सोडल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कृष्णा नदीची पाणीपातळी वाढल्याने वाई शहरातील महागणपती पुलाला पाणी लागले आहे, तर महागणपती मंदिरात गणपतीच्या पायाला पाण्याचा स्पर्श झाला आहे. कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने महागणपती व छत्रपती शिवाजी पुलावरून पाणी पातळी पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. कोणीही नदीपात्रात उतरू नये, नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास ती तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावित, सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत जलसंपदा विभागास व प्रशासनास सहकार्य करावे असे धरण पूरनियंत्रण कक्ष, सातारा सिंचन विभाग, सातारा यांनी कळविले आहे.