सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सातारा दौऱ्याने शनिवारी जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा प्रचंड खळबळ उडाली. आजारपणातून सावरल्यानंतर प्रथमच साताऱ्यात दाखल झालेल्या पवारांचे शासकीय विश्रामगृह येथे तुतारीच्या जयघोषात आणि घोषणांच्या कडकडाटात जंगी स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीमुळे संपूर्ण परिसर राष्ट्रवादीमय झाला होता.
मुंबईवरून सायंकाळी चारच्या सुमारास पवारांचे वाहन शासकीय विश्रामगृहात दाखल होताच “शरद पवार आगे बढो”, “तुतारी वाजणारच” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. कार्यकर्त्यांचा उत्साह एवढा प्रचंड होता की, खाजगी सुरक्षा रक्षक आणि सातारा पोलिसांना बंदोबस्तासाठी अक्षरशः धावपळ करावी लागली.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाळासाहेब पाटील, राजकुमार पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
९ मे, कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी आणि शरद पवारांचा सातारा दौरा हे समीकरण राज्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहे. राष्ट्रवादीत फूट पडून दोन गट निर्माण झाले असले तरी साताऱ्यातील पवारनिष्ठ कार्यकर्ता अजूनही शरद पवारांभोवती ठामपणे उभा असल्याचे चित्र या दौऱ्यात स्पष्ट दिसून आले.दरम्यान, कर्मवीर पुण्यतिथीनंतर होणारी रयत शिक्षण संस्थेची बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात असून संस्थेतील आगामी संघटनात्मक बदल, धोरणात्मक निर्णय आणि पुढील दिशा यावर बंद दाराआड जोरदार चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या बैठकींमध्ये रयत शिक्षण संस्थेचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.
याशिवाय आगामी स्थानिक राजकारण, जिल्ह्यातील बदलती समीकरणे आणि राष्ट्रवादीच्या संघटनात्मक पुनर्बांधणीवरही सखोल चर्चा झाल्याचे समजते. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर जिल्ह्यात पक्ष बळकट करण्याची मोठी जबाबदारी सोपवली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शासकीय विश्रामगृहातील अँटी चेंबरमध्ये तब्बल दीड तास सुरू असलेल्या बैठकींमुळे राजकीय चर्चांना आणखी उधाण आले. खासदार सुप्रिया सुळे या स्वतः सर्व बैठका, हालचाली आणि समन्वयावर बारकाईने लक्ष ठेवून होत्या. राज्यातील महिला अत्याचारांच्या वाढत्या घटना आणि पोलीस तपास यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत त्यांनी तीव्र नाराजी आणि चिंता व्यक्त केल्याची माहितीही समोर आली आहे.