सातारा : गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या!’च्या जयघोषात सातारकरांनी शनिवारी पाच दिवसांच्या गणरायांना भावपूर्ण निरोप दिला. तीन दिवसांच्या गौराईंचे हळदी-कुंकू, ओवाळणी आणि पूजन झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने त्यांचेही विसर्जन करण्यात आले. गणरायांच्या आगमनापासून सुरू असलेल्या भक्तिमय वातावरणाला निरोपाच्या क्षणी भावनिक किनार लाभली. शहरातील सात सार्वजनिक गणेश मंडळांच्या पाच दिवसांच्या गणरायांचे विसर्जन शनिवारी करण्यात आले.
घरगुती गणरायांसह गौराईंच्या विसर्जनासाठी सातारा पालिका प्रशासनाने शहरातील विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था केली होती. मोठे तळे, बुधवार नाका विसर्जन तळे, दगडी शाळा येथील कृत्रिम तळे, भवानी तलाव तसेच आयुर्वेदिक गार्डन परिसरातील विसर्जनस्थळी भाविकांची वर्दळ होती.
गणरायांना निरोप देताना अनेक गणेशभक्तांनी पारंपरिक वाद्यांच्या साथीने मिरवणूक काढली. गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. महिलांनी गौराईंना ओवाळून, हळदी-कुंकू अर्पण करून भावपूर्ण निरोप दिला. काही कुटुंबांनी घरातील गणरायांचे विसर्जन साधेपणाने केले.
विसर्जनस्थळी भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पालिका प्रशासनाकडून विविध ठिकाणी कर्मचारी तैनात करण्यात आले होते. सुमारे 25 कर्मचारी विसर्जन व्यवस्थेत कार्यरत होते. मुख्याधिकारी विनोद जळक यांनी विविध विसर्जनस्थळांची पाहणी करून व्यवस्थेचा आढावा घेतला.
विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही शहरात बंदोबस्त ठेवला होता. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, सातारा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन म्हेत्रे आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील बंदोबस्ताची पाहणी केली.
दरम्यान, पाच दिवसांच्या गणरायांना निरोप झाल्यानंतर आता सातारकरांचे लक्ष सार्वजनिक गणेश मंडळांच्या आकर्षक देखाव्यांकडे लागले आहे. मोती चौक, राजवाडा, बुधवार नाका आणि भवानी तलाव परिसरात गणेशोत्सवातील गर्दी वाढण्याची शक्यता असून, वाहतूक आणि सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
सातारकरांचा पाच दिवसांच्या गौरी-गणरायांना निरोप; गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात पाच दिवसांच्या गणरायांचे विसर्जन
by Team Satara Today | published on : 20 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा