अवघ्या बारा तासांत रिक्षा चोरीचा तपास; सातारा डी.बी. पथकाची कर्नाटकात कारवाई; अट्टल चोरटा जेरबंद, चोरीची रिक्षा जप्त

by Team Satara Today | published on : 22 November 2025



सातारा : सातारा शहर पोलिसांच्या डी. बी. पथकाने अवघ्या १२ तासांत रिक्षा चोरीचा गुन्हा उघडकीस आणत अट्टल चोरट्याला कर्नाटक राज्यातून ताब्यात घेतले असून चोरीस गेलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे. दि. १८ नोव्हेंबर रोजी पहाटे कोडोली गावातील एका ठिकाणी उभी असलेली रिक्षा एका अनोळखी इसमाने चोरून नेली. रिक्षा मालकाने गावात तसेच सातारा परिसरात शोध घेतल्यानंतरही काहीच निष्पन्न न झाल्याने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुन्हा दाखल होताच सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज, परिसरातील गोपनीय माहिती व तांत्रिक तपास सुरु केला. तपासात हा गुन्हा रेकॉर्डवरील सराईत चोरटा प्रल्हाद शिवाजी पवार (वय ३०, रा. गोपाळवस्ती, अजंठा चौक, सातारा) याने केल्याची माहिती समोर आली.

संबंधित आरोपीचा मोबाईल बंद असल्याने तांत्रिक तपासाला मर्यादा होत्या. तरीही पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे रिक्षा कर्नाटकातील दिशेने गेल्याचे ओळखले. आरोपी कर्नाटकमध्ये जात असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी त्याचे जुने फोटो विविध ठिकाणी दाखवत शोध मोहीम सुरू ठेवली. त्यानुसार आरोपी आप्पाचीवाडी येथील एका मंदिराजवळ असल्याची माहिती मिळताच पथकाने तत्काळ धाव घेत आरोपीला तेथे जेरबंद केले.

या चौकशीत आरोपीने रिक्षा चोरल्याची कबुली दिली व ती सातारा शहरातील एका ठिकाणी लपवून ठेवली असल्याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ रिक्षा जप्त केली आणि आरोपीला अटक करून पुढील तपासासाठी ताब्यात घेतले. सदरची कारवाई अवघ्या १२ तासांत पूर्ण करून सातारा शहर पोलीस डी.बी. पथकाने पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय अधिकारी राजीव नवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पो.हवा. निलेश यादव, सुजीत भोसले, निलेश जाधव, विक्रम माने, प्रविण कडव, पो.ना. पंकज मोहिते, पो.कॉ. तुषार भोसले, सागर गायकवाड, सचिन रिटे, संतोष घाडगे, विशाल धुमाळ, मच्छद्रिंनाथ माने, आशिकेष डोळस, वैभव माने, सुशांत कदम, सुहास कदम यांनी या कारवाईत सहभाग घेतला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहरातील पोवईनाका पोस्ट ऑफिससमोर देशी दारूच्या वाहतूकप्रकरणी एकजण ताब्यात
पुढील बातमी
साताऱ्यात होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी 'अजिंक्यतारा'कडून २५ लाख ; संमेलनाच्या यशस्वीतेसाठी योगदान द्यावे - ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले

संबंधित बातम्या