सातारा : संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सदरबाजार परिसरात भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा अनोखा संगम पाहायला मिळाला. श्री विठ्ठल मंदिरापासून निघालेल्या भव्य पालखी मिरवणुकीने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला. टाळ-मृदंगाचा निनाद, अभंगांचे सूर आणि विठ्ठल नामाचा जयघोष यामुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले.
माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक शंकर माळवदे तसेच सामाजिक कार्यकर्ते सुनील भुतकर यांच्या पुढाकारातून बकरे, माळवदे, गाडेकर, फुटाणे, धोंगडे, बारटक्के आणि भुतकर परिवाराच्या सहकार्याने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
श्री विठ्ठल मंदिरातून पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला. अग्रभागी वारकरी संप्रदायातील महिला टाळांच्या तालावर अभंग आणि नामस्मरण करत सहभागी झाल्या होत्या. पारंपरिक वेशभूषेतील महिला व वारकर्यांनी मिरवणुकीची शोभा वाढवली. संत नामदेव महाराजांच्या पालखीचे ठिकठिकाणी नागरिकांनी दर्शन घेत पूजन केले. अनेक भाविकांनी पालखीवर पुष्पवृष्टी करून श्रद्धा व्यक्त केली.
मिरवणुकीदरम्यान ज्ञानोबा-तुकाराम, संत नामदेव महाराज की जय, अशा जयघोषाने सदर बाजार परिसर निनादून गेला. परिसरातील नागरिक, भाविक आणि वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने सोहळ्याला उत्स्फूर्त स्वरूप प्राप्त झाले. संत नामदेव महाराजांची भक्ती, समता आणि समाजप्रबोधनाची शिकवण नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, तसेच वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा जपली जावी, या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याची सांगता भक्तीमय वातावरणात झाली.