सातारा : राजकोट येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची दुर्घटना क्लेशदायी आहे. याचे देशातील सर्व जाती बांधवांना दुःख आहे. पुतळा उभारणीतील कच्चे दुवे व निसर्गाची अवकृपा या कारणामुळे ही दुर्घटना घडली आहे. या अभागी घटनेचे कोणी स्वतःच्या लाभासाठी राजकारण करून भांडवल करू नये. तसेच कोणालाही विशेष लक्ष बनवणे टाळले पाहिजे, असे कळकळीचे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
जलमंदिर येथून प्रसिद्ध झालेल्या पत्रकात नमूद आहे की, छत्रपती शिवरायांच्या अलौकिक कार्याचा महाराष्ट्रासह तमाम देशवासियांना अभिमान आहे. त्यांची शिकवण आणि राज्यकारभार आजसुद्धा उपयुक्त आहे. त्यांचे अतुलनीय आणि अलौकिक कार्य आपल्या सर्वांच्या जीवनातील प्रत्येक वळणावर दीपस्तंभाप्रमाणे आहे. राजकोट येथील पुतळा कोसळण्याची दुर्घटना दुःखकारक आहे. समाजातील प्रत्येक घटकांनी या प्रकरणात संयम बाळगला पाहिजे. या घटनेची सखोल चौकशी करुन जे कोणी दोषी असतील त्यांना कठोर शासन व्हावे. मात्र विनाकारण या प्रकरणाचे कोणी राजकारण करून त्याच्या भांडवलाद्वारे कोणालाही कोणी लक्ष करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रेरणादायी भव्य पुतळा त्याच ठिकाणी पुन्हा दिमाखात उभा राहिला पाहिजे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकात नमूद केली आहे. यासाठी राज्य शासनाने समुद्राच्या वातावरणातील बदलांचा अभ्यास करून अत्यंत मजबूत असा पुतळा उभा करावा, असेही पुढे पत्रकात नमूद आहे.
छत्रपती शिवरायांच्या पुतळा प्रकरणावरून कोणालाही लक्ष करू नये
खासदार उदयनराजे भोसले यांचे आवाहन
by Team Satara Today | published on : 30 August 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा