डोंगरी महोत्सव कालावधीत चोख पोलीस राहणार; एसटीच्या जादा बसेस सोडणार - पालकमंत्री शंभूराज देसाई

by Team Satara Today | published on : 30 March 2026


सातारा  :   डोंगरी महोत्सव येत्या 2 ते 6 एप्रिल 2026 या कालावधीत मरळी ता. पाटण येथे होणार आहे. महोत्सवाला पाटण तालुक्यातील नागरिकांची गर्दी होणार आहे. महोत्सव कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल, गर्दीचे आणि वाहतुकीचे व्यवस्थापन ही अतिशय चांगले करण्यात येईल, असे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात डोंगरी महोत्सवाच्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत पालकमंत्री श्री. देसाई बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद्ध, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, आत्माचे प्रकल्प संचालक अजय शेंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

महोत्सव कालावधीत मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीस विभागाने दक्षता घ्यावी. लोकांच्या येण्या-जाण्याची व्यवस्था चांगली रहावी यासाठी एसटी महामंडळाने नियोजन केले असून त्यामध्ये जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, डोंगरी महोत्सवाल पाटण तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात त्यांना हुल्लडबाजांकडून कोणताही त्रास होऊ नये,  कोणत्याही महिलेची छेड काढली जाऊ नये यासाठी साध्या वेशातील पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. पोलिसांनी महिलांच्या व बालकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे.  डोंगरी महोत्सवाला जास्तीत जास्त नागरिक उपस्थित राहण्यासाठी परिवहन विभागाने ज्यादाच्या एसटी बसेस सोडावेत, असेही निर्देश पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.

कोयना दौलत डोंगरी महोत्सवाकरिता प्रवाशांना जाण्या- येण्याच्या सुविधेसाठी दि.2 ते 6 एप्रिल या कालावधीत एसटी महामंडळा  केलेले गाड्यांचे नियोजन पुढील प्रमाणे. मरळी कारखाना येथून नवा रस्ता परिसरातील प्रवाशांकरिता प्रत्येक तीस मिनिटाला बसेस निघतील. 

पाटण परिसरातील प्रवाशांसाठी नवा रस्ता ते मरळी कारखाना या मार्गावर जाता येता प्रत्येकी ३० मिनिटाला फेऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच पाटण-मरळी-ढेबेवाडी या मार्गावर प्रत्येकी ४५ मिनिटाला बस ची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच केळोली, पाडळोशी, जळव तारळे, सडावाघापूर तारळे, कोयना, जिंती, सळवे, काळगाव, वाल्मिक, वनकुसवडे, कुसरुंड व चोरे या परिसरातील प्रवाशांसाठी मरळी कारखाना येथून शेवटची बस रात्री 10.30 वाजता सुटेल.

तसेच परिवहन खात्यामार्फत गोकुळ धरण काहिर हुंबरणे पांढरपाणी आटोली मुरुड घाटेवाडी चाफोली गोवारे कुंभरगाव या गावांसाठी बस ची व्यवस्था करण्यात आली आहे

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचा सत्कार

 '१५० दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम' प्रभावीपणे राबवून सातारा जिल्हा परिषदेने शंभर टक्के गुण मिळवत राज्यात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचा गौरव करण्यात आला होता. या गौरवपूर्ण कामगिरीबद्दल पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचा सत्कार केला.

सातारा जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. जिल्हा परिषदेने मिळवलेले हे यश प्रशासनाच्या कष्टाचे फळ आहे. भविष्यातही जिल्ह्याच्या विकासासाठी असेच उत्कृष्ट काम व्हावे, अशा शब्दांत पालकमंत्र्यांनी कौतुक केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा-लातूर व सातारा-पंढरपूर महामार्गाची अर्धवट कामे प्राधान्याने पूर्ण करा - ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे
पुढील बातमी
साताऱ्यात बसवण्यात येणारा लोकशाहिरांचा पुतळा तयार; नगराध्यक्षांसह मातंग समाजातील नेत्यांकडून मुंबईत पाहणी

संबंधित बातम्या