केदारनाथ यात्रेवरुन जोरदार राजकारण

यात्रेमध्ये गैर हिंदूवर बंदी घालण्यात यावी भाजप नेत्यांची मागणी

by Team Satara Today | published on : 17 March 2025


उत्तराखंड : सर्व हिंदूंसाठी आणि शिवभक्तांसाठी चार धाम यात्रा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर ३० एप्रिलपासून चार धाम यात्र सुरू होणार आहे, या दिवशी गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडले जातील. केदारनाथ धामचे दरवाजे हे २ मे रोजी तर बद्रिनाथ धामचे ४ मे रोजी उघडले जाणार आहे. मात्र केदारनाथ यात्रेवरुन जोरदार राजकारण रंगण्यास सुरुवात झाली आहे. केदारनाथ यात्रेमध्ये गैर हिंदूंवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. यावरुन आता विरोधकांनी देखील टोला लगावला आहे.

उत्तराखंडच्या भाजपा नेत्या आणि केदारनाथ येथील आमदार आशा नोटियाल यांनी केदारनाथ यात्रेबद्दल वादग्रस्त विधान केले. यामुळे मात्र नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. केदारनाथ येथे मांसाहार, मासे किंवा मद्य दिले जात आहे का? याबद्दल विचारले असता नौटियाल यांनी हे सखोल चौकशीनंतरच हे कळू शकेल असे उत्तर दिले. आशा नोटियाल यांनी केदारनाथ यात्रेला गैर हिंदूंना येऊ देऊ नये अशी मागणी केली आहे. त्या म्हणाल्या की, “काही गैर हिंदू घटक हे केदारनाथ धामच्या पावित्र्याला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा गंभीर आरोप आमदार आशा नोटियाल यांनी केला आहे.

पुढे त्या म्हणाल्या की, “जर काही लोक असे काही करत असतील ज्यामुळे केदारनाथ धामची प्रतिमा घराब होईल तर त्यांच्या प्रवेशावर बंदी घातली पाहिजे. ते निश्चितपणे बाहेरून येणारे गैर-हिंदू आहेत जे बाहेरून येथे येतात आणि धामची बदनामी करण्यासाठी अशा गोष्टी करू लागतात, असा घणाघाती आरोप आमदार नोटियाल यांनी केला. त्याचबरोबर या मुद्द्यांवर मंत्री सौरभ बहुगुणा यांनी देखील स्थानिक प्रशासन आणि लोकांच्या भावना जाणून घेतल्या आहेत. यावेळी बैठकीमध्ये गैर-हिंदू व्यक्ती हे केदारनाथ मंदिराच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांची ओळख पटवून त्यांच्या मंदिराच्या परिसरातील प्रवेशावर बंदी घातली पाहिजे”, अशी मागणी समोर आली आहे.

भाजप आमदारांच्या या मागणीमुळे कॉंग्रेस देखील आक्रमक झाली आहे. कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी देखील यावरुन प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली असून भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री हरिष रावत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “भाजपा नेत्यांना खळबळजनक वक्तव्ये करण्याची सवय आहे. उत्तराखंड ही ‘देवभूमी’ आहे आणि कुठंपर्यंत तुम्ही सर्व काही धर्माशी जोडाल? ते हे सर्व करत आहेत कारण त्यांच्याकडे लोकांना सांगण्यासाठी काहीही नाही.” असा घणाघात माजी मुख्यमंत्री हरिष रावत यांनी केला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
डोंगरी महोत्सवाच्या भव्य आयोजनासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे : पालकमंत्री शंभूराज देसाई
पुढील बातमी
ध्यास फाउंडेशन च्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

संबंधित बातम्या