जमीन विक्रीचे आमिष दाखवून कोरेगावातील एकाची १ कोटी ३१ लाख रुपयांची फसवणूक; दोन आरोपींना अटक

by Team Satara Today | published on : 02 May 2026


कोरेगाव  : जमीन खरेदीच्या आमिषाने विश्वास संपादन करून तब्बल १ कोटी ३१ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार कोरेगाव शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला दोन्ही आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आनंद यशवंत बर्गे (वय ४५, रा. शिवाजीनगर, कोरेगाव) यांना आरोपींनी जमीन विक्रीचे आमिष दाखवून मोठा आर्थिक गंडा घातला. आरोपी राजेश महादेव शेकटकर (रा. बावधन, पुणे) व गोपाल वेलियाविटील (रा. सातारा) यांनी संगनमत करून सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथील गट क्रमांक ५४९/२ मधील सुमारे ५ एकर २ गुंठे जमीन विक्रीस देण्याचे आश्वासन दिले.

सदर जमीन खरेदी प्रक्रियेत अडथळा ठरत असलेल्या डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी पैसे लागणार असल्याचे सांगत आरोपींनी बर्गे यांचा विश्वास जिंकला. त्यानंतर एप्रिल २०२४ पासून टप्प्याटप्प्याने बर्गे यांच्याकडून १ कोटी ३१ लाखांहून अधिक रक्कम उकळण्यात आली. मात्र, कर्ज फेडल्यानंतरही आरोपींनी जमीन फिर्यादींच्या नावावर न करता ती स्वतःच्या नावावर करून घेतली. तसेच घेतलेली रक्कम परत देण्यासही टाळाटाळ करत विश्वासघात व फसवणूक केल्याचे उघड झाले.

या गंभीर प्रकाराची तक्रार येताच गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ओंकार भेगडे यांनी तातडीने तपास सुरू केला. विशेष पथक तयार करून पुणे व सातारा येथे रात्रीच छापे टाकण्यात आले आणि शुक्रवारी रात्री दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींना शनिवारी सकाळी उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून दुपारी कोरेगाव न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती यवतकर यांनी दोन्ही आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली. या कालावधीत आरोपींकडून अधिक माहिती उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात राजलक्ष्मी थिएटर परिसरातील कॅफेवर पोलिसांचा छापा; चालकावर 'पॉक्सो' अन्वये गुन्हा
पुढील बातमी
करंजे पेठ येथील श्रीपतराव पाटील हायस्कूल व जुनियर कॉलेजचा बारावीचा निकाल 96.55 टक्के

संबंधित बातम्या