पुसेगावच्या बैलबाजारात अनुचित प्रकार आढळल्यास कारवाई होणार; श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचा इशारा

by Team Satara Today | published on : 15 December 2025


पुसेगाव : श्री सेवागिरी महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त भरविण्यात आलेल्या बैलबाजारात हजारोंच्या संख्येने खिलार जनावरे व पशुधन दाखल होत आहेत. या बाजारात शासकीय नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. बाजारात जनावरांच्या खरेदी विक्रीबाबत कोणताही अनुचित प्रकार आढळून आल्यास देवस्थान ट्रस्ट त्यावर कायदेशीर कारवाई करेल, असा इशारा मठाधिपती महंत सुंदरगिरी महाराज व ट्रस्टचे अध्यक्ष संतोष वाघ यांनी दिला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात जातिवंत खिलार जनावरांसाठी प्रसिद्ध असलेल्या या बैलबाजारात जनावरांची होणारी विक्री ही शेतकरी केंद्रबिंदू मानूनच केली जाते, तसेच या बाजाराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे खिलार जनावरांचे संरक्षण व संगोपन करणे हे असून, गेल्या ७७ वर्षांपासून ही परंपरा जपली गेली आहे. या बाजारातून कोणालाही कायदा मोडून व किंवा अवैधपणे जनावरांची खरेदी किंवा विक्री होऊ नये म्हणून देवस्थान ट्रस्टच्यावतीने खबरदारी घेतली जात आहे.

या बैलबाजारात महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणा या राज्याच्या अनेक भागांतून शेतकरी, तसेच व्यापारी खिलार बैल आणि पशुधनाच्या खरेदी-विक्रीसाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात. आजपासून बाजारात जनावरे खरेदी-विक्री व्यवहारांना सुरुवात झाली आहे. गोवंश संरक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेतील बैलबाजारात जनावरांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार देवस्थान ट्रस्ट आणि बैलबाजार समिती यांच्या मार्गदर्शनाखाली लिखित नोंदी ठेवून होत आहेत. यावर्षी पर्जन्यमान चांगले झाले असल्यामुळे खरेदी विक्री विक्रमी होईल असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर बाजारात शासकीय नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाईल, असे ट्रस्टचे अध्यक्ष संतोष वाघ, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, बाळासाहेब ऊर्फ संतोष जाधव, सचिन देशमुख, गौरव जाधव यांनी सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
झाडाणी प्रकरणाची सुनावणी पूर्ण - सुशांत मोरे; अहवाल शासनाकडे पाठवणार
पुढील बातमी
पै. इस्माईलसाहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्काराने होणार ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांचा सन्मान

संबंधित बातम्या