साताऱ्यात पावसाचा जोर आजही कायम; जिल्ह्यात ८३ घरांचे नुकसान, सहा पशुधन दगावले; महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक ४०७ मिलिमीटर पाऊस

by Team Satara Today | published on : 08 July 2026


सातारा : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आजही कायम आहे. मुसळधार पावसाने पाटण, महाबळेश्वर, जावळी तालुक्यांत अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. पावसाच्या संततधारेमुळे धरणांमधील पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली असून, गेल्या २४ तासांत कोयना धरणामध्ये तब्बल आठ टीएमसीची वाढ झाली आहे. 

मुसळधार पावसाने पाटण तालुक्यात एका ठिकाणी रस्ता खचल्याने वाहतुकीवर परिणाम झाल्‍याने प्रशासनाने तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेतली. जावळी तालुक्यात बाहुळे येथे दरड कोसळल्याची घटना घडली असून, संबंधित यंत्रणांनी परिसर सुरक्षित करून परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेती, रस्ते, तसेच अन्य मालमत्तेचे नुकसान झाले असून, महसूल विभागाकडून पंचनाम्यांचे काम युद्धपातळीवर सुरू करण्‍यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना नदी, नाले व ओढ्यांच्या परिसरात जाणे टाळावे, पूरस्थिती निर्माण झालेल्या ठिकाणी गर्दी करू नये, तसेच अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक ४०७ मिलिमीटर पाऊस

महाबळेश्वर परिसरात गेल्‍या १२ तासांत सर्वाधिक ४०७ मिलिमीटर पाऊस झाला, तर नवजा येथे ३२८ आणि कोयना क्षेत्रात ३६४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर, जावळी आणि वाई तालुक्यांतील एकूण ८५ नागरिकांचे सुरक्षितस्थळी तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे.

सहा जनावरांचा मृत्यू

जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असून, पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत सहा जनावरे दगावली आहेत. या घटनांचे महसूल व पशुसंवर्धन विभागामार्फत पंचनामे पूर्ण करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे यांनी केले आहे.

सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावासह जावळी तालुक्‍यातील महू- हातगेघर प्रकल्‍प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. या ठिकाणांसह महिंद प्रकल्‍पाच्‍या सांडव्यावरून पाणी बाहेर पडत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता; राज्यातील अनेक प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ
पुढील बातमी
संभाजीनगर-कोडोली परिसरात ३५ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

संबंधित बातम्या