पाण्यासाठी नागरिकांचा जीवन प्राधिकरण कार्यालयात ठिय्या

सोळा दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प; अधिकाऱ्यांना घेराव

सातारा : समाधीचा माळ, दरे व पेढ्याचा भैरोबा परिसरात राहणाऱ्या नागरिकांचा पाणीपुरवठा गेल्या १६ दिवसांपासून बंद आहे. तो पूर्ववत करण्यासाठी कोणत्याही हालचाली केल्या जात नसल्याने संतप्त रहिवाशांनी गुरुवारी सकाळी जीवन प्राधिकरण कार्यालयावर मोर्चा काढला. महिलांनी पाण्याची रिकामी भांडी घेऊन कार्यालयात ठिय्या आंदोलन करतानाच अधिकाऱ्यांना घेरावही घातला.

समाधीचा माळ, दरे परिसराला कण्हेर योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. हा भाग जरी पालिकेच्या अखत्यारित असला तरी योजना जीवन प्राधिकरणकडून चालविली जाते. या योजनेच्या मुख्य जलवाहिनीला सातत्याने गळती लागत आहे. मात्र दुरुस्तीकडे प्राधिकरण डोळेझाक करत असून, पालिकेला ही कामे करावी लागत आहेत. येथील रहिवाशांनी अनामत रक्कम भरून आज सात वर्षे झाली तरी नळांना मीटर बसविण्यात आले नाही. पाणी गळतीमुळे नागरिकांना आजवर कधीही नियमित व पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा झालेला नाही. आता तर सोळा दिवसांपासून या भागाचा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला असून, पालिकेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या योजनेची जबाबदारी असलेल्या जीवन प्राधिकरणकडून मात्र देखभाल दुरुस्ती व अन्य कामांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप यावेळी नागरिकांनी केला.

प्राधिकरणने नळांना मीटर बसवावेत, मुख्य लाईनवरील नळजोडण्या काढून त्या सबलाईनवर जोडाव्यात, अशा मागण्या यावेळी नागरिकांनी केल्या. उपकार्यकारी अभियंता लीना गडकरी यांनी नागरिकांचे निवेदन स्वीकारून याबाबत कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले. आठ दिवसांत कार्यवाही न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला.



मागील बातमी
अपघात प्रकरणी कारचालकावर गुन्हा
पुढील बातमी
आसगावच्या माझी वसुंधरा अभियान, ग्रामस्थांच्या एकीने ठरले स्वाभिमान....

संबंधित बातम्या