सातारा : मेढा पोलीस ठाण्याच्या पथकाने ट्रॅक्टर फसवणुकीच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला अटक करून गुन्ह्यातील तब्बल ९,१५,००० रुपयांचा दोन ट्रॅक्टरांचा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. १६/०८/२०२४ रोजी फिर्यादी अजित मोहन दुदुन्कर (वय ४० वर्षे, व्यवसाय शेती, रा. मोरेवाडी, पो. दरेखुर्द, ता. जावली) यांच्या मालकीचा महिंद्रा कंपनीचा ओजा २७ एच.पी. ट्रॅक्टर (क्र. एम.एच.११ डी.एन. २३३७) हा आरोपी अजय संतोष चव्हाण (वय २३, रा. सरताळे, ता. जावली) याने ट्रॅक्टरचे हप्ते भरण्याची नोटरी करून घेतला होता. मात्र हप्ते न भरता तो ट्रॅक्टर तिसऱ्या व्यक्तीस देऊन फिर्यादीचा विश्वासघात करून फसवणूक केली. तसेच साक्षीदार दत्तात्रय रामचंद्र चव्हाण (रा. म्हसवे, ता. जावली) यांच्याकडील कॅप्टन कंपनीचा २८३४ डबल्युडी मॉडेल ट्रॅक्टर (क्र. एम.एच.११ डी.ए. १२०६) देखील आरोपीने फसवणूक करून घेतल्याचे समोर आले.
याबाबत मेढा पोलीस ठाण्यात दिनांक २६/०१/२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक सातारा तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग सुनील साळुंखे यांनी तपासाबाबत मार्गदर्शन केले. त्यानुसार आरोपी अजय संतोष चव्हाण यास दि. १७/०२/२०२६ रोजी पहाटे ०१:२९ वाजता अटक करण्यात आली. त्यास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, मेढा यांच्यासमोर हजर केले असता दि. २१ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.
पोलीस कोठडीत सखोल चौकशीदरम्यान आरोपीने दोन्ही ट्रॅक्टर कोपरगाव, जि. अहिल्यानगर येथील एका व्यक्तीस दिल्याची कबुली दिली. त्यानुसार पंचनामा करून खालीलप्रमाणे ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. महिंद्रा ओजा २७ एच.पी. ट्रॅक्टर (क्र. एम.एच.११ डी.एन. २३३०) किंमत : ५,९५,०००/- रुपये, कॅप्टन २८३ ४हऊ मॉडेल ट्रॅक्टर (क्र. एम.एच.११ डी.ए. ५२०६) किंमत : ३,२०,०००/- रुपये एकूण जप्त मुद्देमाल : ९,१५,०००/- रुपये (१००%)
सदर कारवाईत मेढा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक सुधीर पाटील तसेच पोलीस कर्मचारी प्रमोद निकम, सनी काळे, सुरज वाघमळे, सुनील वाघमळे, ओंकार चव्हाण, अजय गुरव आदींनी सहभाग घेतला.या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी अभिनंदन केले आहे.