कराड येथील सहा पदरी उड्डाणपूल घाईगडबडीने खुला करण्याचा प्रशासनाचा घाट; अपूर्ण कामांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात

by Team Satara Today | published on : 05 June 2026


कराड : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कराड येथील सहा पदरी उड्डाणपुलाची सातारा-कोल्हापूर एक लेन वाहतुकीला खुली करण्यासाठी प्रशासनाकडून कमालीची घाईगडबड सुरू आहे. मात्र, पुलावरील अनेक महत्त्वाची कामे अद्याप प्रलंबित असल्याने ही घाई वाहनधारकांच्या आणि प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या उपाययोजना शून्य असतानाच हा पूल सुरू करण्याचा प्रयत्न होत असल्याने नागरिक आणि वाहनधारकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर हा पूल लवकरच खुला होणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर या भागातील प्रवाशांनी सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाच्या या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ​सध्या या उड्डाणपुलावर कोल्हापूरहून पुणे बाजूकडे जाणारी वाहतूक नांदलापूरनजीक पुलावर घेऊन, ती पुढे सातारा-कोल्हापूर लेनवरून सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे. त्यासाठी पुलावर युद्धपातळीवर कामे उरकली जात आहेत, मात्र हा वेग प्रवाशांच्या सुरक्षिततेला छेद देणारा ठरत आहे. उड्डाणपुलाचा अंतिम भराव अद्याप दोन जुन्या कोयना पुलांना जोडलेला नाही. जोपर्यंत जुन्या कोयना पुलाच्या दोन्ही बाजूंचे दोन नवीन पूल वाहतुकीला पूर्णपणे खुले केले जात नाहीत, तोपर्यंत हा भराव जोडणे शक्य नाही. सद्यस्थितीत या जोडणीचे काम अद्याप सुरूही झालेले नाही, तरीही एका बाजूची लेन खुली करण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो.

​सुरक्षित प्रवासासाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांची पुलावर मोठी कमतरता आहे. हॉटेल ग्रीन पार्क ते कृष्णा हॉस्पिटल दरम्यान स्ट्रीट लाईट्स बसवण्यात आल्या असल्या, तरी तिथून पुढे कोयना पुलापर्यंत अद्याप विजेचे खांब आणि दिवे लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी या पुलावरून प्रवास करणे अपघातांना आमंत्रण देणारे ठरेल. तसेच नांदलापूरपासून पुढे काही अंतरावर आणि मुख्य पुलावर अनेक ठिकाणी दुभाजकांचे काम अपूर्ण अवस्थेत आहे, तर काही ठिकाणी दुभाजकच उभारण्यात आलेले नाहीत. कोल्हापूर-सातारा लेनवरील एक्सपान्शन जॉइंटचे कामही केवळ ७५ टक्के झाले असून उर्वरित काम अद्याप बाकी आहे. हे काम अर्धवट असताना दुसऱ्या बाजूची वाहतूक सुरू केल्यास मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. काही ठिकाणी संरक्षक कठड्यांचे कामही अद्याप रेंगाळलेले आहे.

​पावसाळा तोंडावर आलेला असताना या उड्डाणपुलावर पाण्याचा निचरा होण्याची कोणतीही सक्षम व्यवस्था केलेली नाही. ज्या लेनवरून वाहतूक सुरू केली जाणार आहे, तिथे अजूनही वॉटर आउटलेटचे काम झालेले नाही. पुलावर अनेक ठिकाणी चढ-उतार असल्याने पावसाळ्यात पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची भीती असून, यामुळे वाहने घसरून अपघात होण्याचा धोका वाढला आहे. सध्या केवळ हॉटेल ग्रीन पार्क ते कृष्णा हॉस्पिटल दरम्यान पांढरे पट्टे मारून त्यावर लाल-पांढरे लाईट रिफ्लेक्टर बसवण्याचे काम करून प्रशासनाकडून कामाचा केवळ मुलामा दिला जात आहे. परंतु, कृष्णा हॉस्पिटलच्या पुढे सुरक्षेच्या दृष्टीने कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. नांदलापूर ते कोयना पूल या पाच किलोमीटरच्या अंतरात वाहनांची गती नियंत्रित करण्यासाठी वेग मर्यादा, धोकादायक वळणे किंवा चढ-उतार दर्शवणारे कोणतेही मार्गदर्शक व सूचना फलक अद्याप लावण्यात आलेले नाहीत.

​दुसरीकडे, कोयना नदीवर सातारा-कोल्हापूर लेनवर बांधण्यात आलेल्या नवीन पुलाबाबतही असाच निष्काळजीपणा समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वी डांबरीकरण पूर्ण झाल्यानंतर, कोणतीही तांत्रिक तपासणी न करता आणि पुलावरील एक्सपान्शन जॉइंटचे काम पूर्ण न करताच हा पूल गुरुवारी वाहतुकीला खुला करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, उड्डाणपुलाच्या भरावाचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी पाटण तिकाटणे येथील पूल संपल्यानंतर कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक नवीन कोयना पुलावर वळवण्यात आली आहे. त्यासाठी माऊली हॉटेल आणि पलाश मल्टीपर्पज हॉलसमोर बॅरिगेट्स लावण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कोणत्याही प्रकारची घाई न करता, सर्वप्रथम पथदिवे, दुभाजक, सूचना फलक आणि पाण्याच्या निचऱ्याची कामे पूर्ण करावीत आणि त्यानंतरच हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने खुला करावा, अशी आग्रही मागणी आता वाहनधारकांकडून केली जात आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कराड येथील कोल्हापूर नाका परिसरातील उड्डाणपूल येत्या २० जूनपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार; वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार
पुढील बातमी
शेखर चरेगावकर यांचा जामीन फेटाळला; सरकारी वकिलांच्या परखड युक्तिवादानंतर कराड न्यायालयाचा निर्णय

संबंधित बातम्या