खवले मांजराच्या तस्करी प्रकरणी वहागाव येथील एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 30 December 2024


सातारा : सुरूर, ता. वाई येथे अतिदुर्मिळ असलेल्या खवले मांजराच्या तस्करी प्रकरणी वहागाव, ता. वाई येथील एकावर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

दीपक श्रीरंग मोहिते वय 44 याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याच्याकडून खवले मांजर हस्तगत करण्यात आले आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या शेड्युल एक मधील हे मांजर असल्याने भुईंज पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना वहागाव येथील एकजण खवले मांजराची तस्करी करून विक्री करणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे आणि त्यांच्या पथकाने सुरूर, ता. वाई येथील महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर सापळा लावला व मोहिते याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ पॉलिथिनच्या पोत्यामध्ये दुर्मिळ प्राणी खवले मांजर आढळून आले. त्याने वहागाव च्या हद्दीत डोंगरांमध्ये हे खवले मांजर पकडल्याचे कबूल केले आहे.

या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पोलिस अंमलदार आतिश घाडगे, अजित कर्णे, शिवाजी भिसे, स्वप्निल दौंड, केतन शिंदे, सचिन ससाने, प्रवीण पवार, दलजीत जगदाळे तसेच वनविभागातील वनपाल दिलीप होनमाने, वर्षाराणी चौरे यांनी सहभाग घेतला.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
हुल्लडबाजी कराल, तर पोलीस कारवाईला आमंत्रण द्याल!
पुढील बातमी
तीन विविध घटनेत तिघेजण बेपत्ता

संबंधित बातम्या