वाई : भुईंज पोलीस ठाणे हद्दीतील मौजे सुरूर, ता. वाई येथील बाजार तळावर काही लोक थांबले असल्याची माहिती मिळाल्यानंतर दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे १२.४५ वाजता रात्रगस्तीचे पोलीस उपनिरीक्षक श्री. सूरज शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल किरण निंबाळकर, पोलीस कॉन्स्टेबल सतीश कदम व होमगार्ड हे घटनास्थळी गेले होते.
यावेळी तेथील व्यक्तींनी फलटण येथील काही व्यक्ती त्यांना मारण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार रात्रगस्तीचे पथक पारधी वस्ती सुरुर कडे जात असताना समोरून क्रमांक नसलेली संशयास्पद दुचाकी येताना दिसली. पोलिसांनी सदर दुचाकी थांबवून त्यावरील संशयित व्यक्तींची चौकशी करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी दुचाकीवरील व्यक्तींनी पोलिसांच्या शासकीय कर्तव्यात प्रतिकार करत पोलीस कॉन्स्टेबल किरण निंबाळकर यांच्यावर हत्याराने वार करून त्यांना दुखापत केली संशितांना पकडण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला असता ते दुचाकीवरून कच्च्या रस्त्याने पळून गेले.
या घटनेत पोलीस कॉन्स्टेबल किरण निंबाळकर यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली असून आहे.सदर घटनेप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणणे तसेच पोलीस कर्मचाऱ्याला त्याचे शासकीय कर्तव्य पार पाडण्यापासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने प्रतिकार करून दुखापत केल्याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सदर प्रकरणातील एका संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा व भुईंज पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने ताब्यात घेतले असून, त्यास सदर गुन्ह्यात अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकांकडून तपास सुरू आहे.