फलटण तालुक्यात २५ वर्षांनंतर कापूस शेतीला पुन्हा उभारी; यंदा ८७८ हेक्टरवर लागवड, हमीभावापेक्षा अधिक दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा

by Team Satara Today | published on : 18 October 2026


फलटण : बोंडअळी व अन्‍य कीड-रोगांच्‍या प्रादुर्भावाने सुमारे २५ वर्षांपूर्वी फलटण तालुक्यातून जवळपास नामशेष झालेले ‘पांढरे सोने’ अर्थात कापूस पीक पुन्हा उभारी घेत आहे. गेल्या सात- आठ वर्षांपासून तालुक्यात कापूस लागवडीचे क्षेत्र सातत्याने वाढत असून, यंदाच्या हंगामात तब्बल ८७८ हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड झाली आहे.
कापसाला शासकीय हमीभावापेक्षा अधिक दर मिळू लागल्याने उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍यासाठी यंदाची दिवाळी अधिक गोड होण्याची आशा निर्माण झाली आहे. केंद्र शासनाने २०२६-२७ च्या कापूस हंगामासाठी मध्यम धाग्याच्या कापसाचा प्रतिक्विंटल आठ हजार २६७ रुपये, तर लांब धाग्याच्या कापसाचा प्रतिक्विंटल आठ हजार ६६७ रुपये हमीभाव निश्चित केला आहे.
या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील मिरजगाव येथील शिवधारा कंपनीने फलटण-आसू मुख्य रस्त्यावरील ढवळेवाडी येथे कापूस खरेदी व प्रक्रिया (जिनिंग) केंद्र सुरू केले आहे. या केंद्रावर सरासरी प्रतिक्विंटल नऊ हजार रुपये दर देण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
तालुक्याच्या पूर्व भागातील आसू, पवारवाडी, गोखळी, हणमंतवाडी, शिंदेनगर आणि साठेफाटा, तसेच पश्चिम भागातील आदर्की, साखरवाडी, जिंती, चौधरवाडी व कांबळेश्वर परिसरात कापूस लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. सध्या शिवारातील कापूस वेचणी अंतिम टप्प्यात असून, काही ठिकाणी शेवटची वेचणी सुरू आहे. शेतकऱ्यांच्या माहितीनुसार, प्रतिहेक्टरी सुमारे १५ ते १८ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत आहे. यापूर्वी कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना मिरजगाव येथे जावे लागत होते. आता ढवळेवाडी येथेच खरेदी व प्रक्रिया केंद्र सुरू झाल्याने वाहतुकीचा त्रास आणि खर्च कमी होण्यास मदत झाली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राज्यात अन्नसुरक्षेसाठी कारवाई आणखी कडक करणार - आयुक्त तुकाराम मुंढेंचा इशारा; नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न पोहोचले पाहिजे, हा माझा आग्रह

संबंधित बातम्या