सातारा : मित्राच्या मेहुणीला अश्लील फोटो टाकायला जबरदस्ती करुन नंतर मेहुणीच्या दाजीनेच मेहुणीवर अत्याचार केला असल्याचा गुन्हा सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. पिडीत मुलगी अल्पवयीन असून दोघांवर पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना सप्टेबर व ऑक्टोबर 2024 मध्ये ही घटना घडली आहे. पिडीत मुलगी विवाहित बहिणीकडे गेली होती. त्यावेळी दाजीचा मित्र असलेला शुभम पवार हा मुलीला भेटला. मुलगी घरी एकटी असताना शुभम याने मुलीला भेटून तिचे अश्लील फोटो मोबाईलवर पाठवण्यास सांगितले. जर तसे केले नाही तर चिठ्ठी लिहून आत्महत्या करेन, अशी धमकी मुलीला दिली. या घटनेने मुलगी घाबरली व तिने तिचे अश्लील फोटो शुभम याला पाठवले.
या घटनेनंतर शुभम याने ते फोटो मित्राला म्हणजेच मुलीच्या दाजीला पाठवले. याचा गैरफायदा घेत मुलगी अल्पवयीन आहे, हे माहित असतानाही दाजीने मुलीवर वेळोवेळी अत्याचार केला. या सर्व घटनेने मुलगी घाबरली. यावर दाजीने मेहुणीला अत्याचाराची माहिती कोणाला दिल्यास अश्लील फोटो सर्वांना पाठवेन, अशी धमकी दिली. यामुळे मुलीने अत्याचार सहन केला. तसेच धमकी देत दाजीने मुलीकडून तिच्या वडिलांच्या विरोधात एक चिठ्ठी जबरदस्तीने लिहून घेतली आहे. अत्याचार सहन होत नसल्याने अखेर मुलीने सातारा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना माहिती दिल्यानंतर दाजीसह त्याच्या मित्रावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.