सातारा : पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर येथे घेण्यात आलेल्या महापर्यटन उत्सवात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या मेहनतीतून महाबळेश्वर येथील पेटीट लायब्ररी येथे सातारा जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले. हे प्रदर्शन अत्यंत सुंदर व सातारा जिल्ह्यातील गड किल्ले, ऐतिहासिक, सांस्कृतिक पर्यटन स्थळे यांचे समग्र दर्शन घडविणार आहे. तीन दिवसांच्या पर्यटन उत्सावामध्ये असंख्य पर्यटकांनी या ठिकाणी भेट देऊन या प्रदर्शनाचे कौतुक केले आहे, असे प्रतिपादन पर्यटन विभागाचे संचालक बी.एन. पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्यावीने छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यटन विभागाचे संचालक श्री. पाटील यांनी भेट दिली. त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे उपस्थित होते.
महाबळेश्वर पाचगणी बरोबरच या सर्व पर्यटन स्थळांचा आस्वाद या छायाचित्रांमधून आपल्याला मिळतो. हे प्रदर्शन कायमस्वरूपी जिल्हाधिकारी कार्यालयात मांडण्यात येणार आहे असे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले. शासकीय इमारती या केवळ शासकीय इमारतींच्या भिंती या केवळ भिंती न राहता त्या जिवंत व्हाव्यात आणि त्यांनी आपला इतिहास, आपली संस्कृती, आपलं निसर्ग सौंदर्य याविषयी या ठिकाणी येणाऱ्यांशी हितगुज करावं यासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची ही संकल्पना खरोखरच नाविन्यपूर्ण आहे. हे प्रदर्शन अत्यंत अल्प कालावधीमध्ये उभे करण्यात जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अत्यंत मोलाचे सहकार्य आहे.
या छायाचित्र प्रदर्शनामध्ये प्रामुख्याने योगेश चौकवाले, प्रेशित शिरीष गांधी, संजय दस्तुरे, रमण कुलकर्णी, अशोक कांबळे, विष्णु शिंदे, चंद्रकांत खंडागळे, मनोज सिदमुल,जयश्री चौकवाले, सेजल चौकवाले, ऋता कलमनकर, वैभव देशमुख, अभय हवालदार यांच्या छायाचित्रांचा समावेश आहे.
दहा हजार शब्दांमध्ये निसर्ग सौंदर्याने नटलेल्या स्थळांचे, धबधब्यांचे, तीर्थक्षेत्रांचे गडकिल्ल्यांचे सौंदर्य वर्णन करता येत नाही, ते कॅमेरातून टिपलेल्या एका छायाचित्रातून व्यक्त होते. या छायाचित्र प्रदर्शनात जिल्ह्यातील अनेक दिग्गज छायाचित्रकारांनी टिपलेल्या छायाचित्रांचा समावेश आहे. यामध्ये महाबळेश्वर मधील विविध पर्यटन स्थळे, पाचगणी, वाईचे गणपती मंदिर आहे. प्रतापगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, भवानी मातेचे मंदिर, शिवकालीन दगडी पूल, सज्जनगड, तिच्यावरील रामदास स्वामींची समाधी, पाटेश्वर जे केवळ साताऱ्यापासून 14 किलोमीटर अंतरावरच आहे या ठिकाणी इतकी असंख्य शिवलिंगे आहेत. तितकी शिवलिंगे अन्यत्र कोठेच आपल्याला दिसणार नाहीत. यासह शिलालेख, दीपमाळ, तलाव आहेत. केळवली, ठोसेघरचा धबधबा, शिखर शिंगणापूर मंदिर, चाळकेवाडी इथल्या पठारावरील पवन ऊर्जा प्रकल्प, अनेक विविध रंगांनी फुललेले कासचे पठार, कासचा तलाव, सातारा येथील अजिंक्यतारा, कराड जवळची आगाशिवची लेणी, प्रीतीसंगम, मेनवलीचा घाट, कोयना धरणाचा परिसर, बामनोली,तापोळा इथले वॉटर स्पोर्ट्स, पाली, क्षेत्र माहुली, संगमाहुली, जबलेश्वर या ठिकाणची मंदिरे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नायगाव येथील जन्मस्थळ, 12 व्या शतकातील बांधलेली नकट्या रावळाची विहीर, धोमचे मंदिर, लिंब येथील बारामोटेची विहीर, औंध आणि सातारा येथील वस्तुसंग्रहालय, कोयना अभयारण्य, त्यातली वनसंपदा अशा अनेक विषयांवरील छायाचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. जी पहात असताना खरोखरच पाहणाऱ्याची तहानभूक हरपून जाते.