शिरवळ : पुणे जिल्ह्यातील भोंगवलीसह ११६ गावांना भेडसावणा-या सब स्टेशन व टॉवर लाईनचा प्रस्ताव स्थगित करावा या मागणीसाठी भोर राजगड सब स्टेशन व टॉवर हटाव संघर्ष समिती यांच्यावतीने कापुरव्होळ याठिकाणी पुकारण्यात आलेल्या रास्ता रोकोच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांसह वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यासह सातारा जिल्ह्यातील प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून आशियाई महाममार्ग ४८ वरील सातारा-पुणे व पुणे-सातारा वाहतूक सातारा जिल्ह्यातून व पुणे शहरातून वळविल्याने प्रवाशांना व वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करीत तब्बल ४० ते ४५ किलोमीटरचा अधिक प्रवास करावा लागला.
पुणे जिल्ह्यात होऊ घातलेल्या ७६५/४००/२२० के.व्ही.जी.आय.एस.सब स्टेशन व टॉवर लाईनला राजगड व भोर तालुक्यातील ११६ गावातील नागरिकांनी विरोध दर्शवत आंदोलनाची भूमिका घेतली असून याकरिता भोर राजगड सब स्टेशन व टॉवर हटाव संघर्ष समितीची स्थापना माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली प्रस्तावाला शासनाने स्थगित करावे या मागणीसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यानुसार कापूरव्होळ याठिकाणी प्रस्तावाला स्थगितीच्या मागणीसाठी आशियाई महामार्ग ४८ वर रास्ता रोकोचा इशारा दिल्यानंतर पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार आशियाई महामार्ग ४८ वरील सातारा-पुणे व पुणे-सातारा अशी वाहतूक व्यवस्था पुणे शहर व सातारा जिल्ह्यातून पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्याने प्रवाशी व वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला.
यावेळी रविवार असल्याने पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या पुणे-मुंबई येथील प्रवाश्यांना पुणे जिल्ह्यातून व सातारा जिल्ह्यातून तब्बल ४० ते ४५ किलोमीटरचा अधिक प्रवास करावा लागल्याने व पर्यायी मार्गावरही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागल्याने प्रवाशी व वाहनचालक हतबल झाले होते. यावेळी पुणे अपर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार,सारोळा महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हणमंत पडळकर तसेच सातारा जिल्ह्यात शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे,खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप तसेच भुईंज महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी महामार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जय्यत तयारी करीत महामार्गवर केसुर्डी,खेड शिवापूर टोलनाका तसेच अनेक ठिकाणी जड वाहतूक थांबविल्याने वाहतूक कोंडी सुटण्यास लवकर मदत झाली.
दरम्यान, पुणे जिल्ह्यात होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आशियाई महामार्गवर येणाऱ्या वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन सातारा पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे,पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीपसिंह गिल,पुणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस अधिक्षक डॉ.शिवाजी पवार यांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महामार्ग पोलीस,स्थानिक पोलीस यांचा योग्य समन्वय साधत पर्यायी मार्गावर वाहतूक वळविल्याने आशियाई महामार्गवर वाहतुकीचा खोळंबा जास्त प्रमाणात न होता कमी वेळामध्ये वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली.त्यामुळे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने केलेल्या करेक्ट कार्यक्रमाची चर्चा आंदोलनस्थळी सुरु होती.