पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्तीतील ३ लाख ५५ हजार ६१४ पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर - सहकार आयुक्त दीपक तावरे

by Team Satara Today | published on : 11 September 2026


पुणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरणासाठीची दुसरी यादी शुक्रवारी (दि.11) प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे 41 हजार आणि व्यापारी बँकांचे 3 लाख 14 हजार मिळून एकूण ३ लाख ५५ हजार ६१४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. या याद्या बँकांच्या शाखा, ग्रामपंचायतीमध्ये लावण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी याद्यांमध्ये आपले नांव तपासून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी केले आहे.
दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांनी दिनांक ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकीची रक्कम तपासून नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रा’मध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण करावे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेली व दिनांक ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेली आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली पीक कर्जे तसेच पुनर्गठित व फेरपुनर्गठित कर्जांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.
योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून, त्यासाठी महाआयटीची नियुक्ती करण्यात आली आहे. योजनेच्या पोर्टलवर बँकांनी एकूण ३१ लाख १७ हजार थकीत कर्ज खात्यांची माहिती अपलोड केली आहे. महाआयटीने संगणकीय प्रक्रियेद्वारे निश्चित केलेल्या १६ लाख ९६ हजार पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी दिनांक २४ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध केली होती.
राष्ट्रीयीकृत आणि व्यापारी बँकांमधील काही शेतकऱ्यांची ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा जास्ती असली, तरी शासनाच्या ‘हेअर कट’ धोरणानुसार ही सर्व कर्ज निरंक करण्यात येणार आहेत. योजनेतील पात्र मृत शेतकरी, वयोवृद्ध तसेच बोटांचे ठसे नोंद होत नसलेल्या लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी १९ ऑगस्ट २०२६ रोजी मानक कार्यप्रणाली (एसओपी) निर्गमित करण्यात आली आहे. दरम्यान, कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या यादीतील आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या १२ लाख ५८ हजार शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांवर १० हजार ११४ कोटी ९० लाख रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात आल्याचे तावरे यांनी कळविले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
'जगात व्यापारी अडथळे वाढत असताना भारत आर्थिक सेतू उभारतोय'; ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
पुढील बातमी
उपोषणाला बसू नका असे सांगू शकत नाही, आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार; मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाविरोधातील याचिकेवर हायकोर्टाचे स्पष्टीकरण

संबंधित बातम्या