लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या; साहित्य क्रांती ज्योत दिंडीचे सातार्‍यात जल्लोषात स्वागत

by Team Satara Today | published on : 30 July 2026


सातारा : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल, दलित विकास आघाडी, कामगार सुरक्षा दल आणि पथारी सुरक्षा दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 13 व्या साहित्य क्रांती ज्योत दिंडी आंदोलनाचे सातारा शहरात उत्साहात स्वागत करण्यात आले.

अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मभूमी वाटेगाव (ता. वाळवा, जि. सांगली) येथून 29 जुलै रोजी सुरू झालेली ही साहित्य क्रांती ज्योत पुण्याकडे मार्गस्थ झाली असून, सातार्‍यातील शाहू चौक येथे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना शिवाजी भोसले आणि दत्तात्रेय यांनी सांगितले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य आणि शाहिरीच्या माध्यमातून वंचित, कष्टकरी, भटके, कामगार आणि उपेक्षित समाजाच्या वेदना जगासमोर मांडल्या. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या या असामान्य कार्याचा सन्मान म्हणून केंद्र शासनाने त्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा, ही जनतेची भावना आहे.

या अभियानाचा शुभारंभ अण्णाभाऊ साठे यांच्या सुनबाई सावित्रीबाई साठे यांच्या हस्ते साहित्य क्रांती ज्योत प्रज्वलित करून करण्यात आला. यावेळी लहुजी शक्ती संघटनेचे शंकरभाऊ तडाखे उपस्थित होते.

ही साहित्य क्रांती ज्योत सातारा आणि शिरवळमार्गे 31 जुलै रोजी पुण्यात दाखल होणार असून, सारसबाग येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर तिचे भव्य स्वागत होणार आहे. या कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक-अध्यक्ष भगवानराव वैराट, प्राचार्या वृषाली रणधीर, प्रा. आसमा शेख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक-अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी अनेक वर्षांपासून अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा यासाठी सातत्याने जनआंदोलन उभारले असून, या अभियानात सुमारे 500 हून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्गावरून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या अशा घोषणांनी जनजागृती करत ही साहित्य क्रांती ज्योत पुण्याकडे प्रस्थान करत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फलटणजवळ स्फोटकांचा मोठा साठा जप्त; 5000 हून अधिक स्फोटकांच्या कांड्यांसह ट्रक सील
पुढील बातमी
बासुंदीच्या गुणवत्तेवर ग्राहकाचे प्रश्नचिन्ह; अन्न व औषध प्रशासनाकडे लेखी तक्रार, उत्पादनातून दुर्गंधी येत असल्याचा आरोप

संबंधित बातम्या