सातारा : आजच्या समाजामध्ये कोयतेशाहीची संस्कृती वाढली आहे. मुलांच्या हातात अशी शस्त्रे न येता त्यांच्या हातात ग्रंथ येणे गरजेचे आहे. राज्य शासनाने ग्रंथांचा समावेश जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत केला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने ग्रंथ संस्कृतीला चालना मिळेल, अशी अपेक्षा वाई येथील विश्वकोश मंडळाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक राजा दीक्षित यांनी केली.
ग्रंथ महोत्सवाच्या समारोप सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी आपले विचार मांडले.अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी होते. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे, शिरीष चिटणीस, प्राचार्य वि. ना. लांडगे, प्रदीप कांबळे, सुनीता कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
दीक्षित पुढे म्हणाले, समाजामध्ये जी शस्त्र प्रधान संस्कृती वाढली आहे त्याला आजची मुले नाही तर आपण जबाबदार आहोत. अशा मुलांच्या हातात कोयत्या ऐवजी ग्रंथ जातील याची काळजी समाजाने घ्यायला हवी कारण वाचन ही सामाजिक गरज आहे लेखक प्रकाशक वाचक ग्रंथ विक्रेते वाचकांनी आपली ग्रंथ संस्कृती जपली पाहिजे ,ती संस्कृती मलीन होता कामा नये . ग्रंथ संस्कृतीचा परिघ विस्तार हा संपूर्ण महाराष्ट्रभर पसरू दे, असे आवाहन त्यांनी केले. राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक गाव पुस्तकाचे हा उपक्रम व्यापक प्रमाणात राबवल्यास ग्रंथ संस्कृतीला चालना मिळेल असे ते म्हणाले.
तुषार दोशी म्हणाले, वाचन ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. वाचन झालं तर दर्जेदार लिखाण होईल. मोबाईल ॲपवर उपलब्ध असलेल्या पुस्तकांमध्ये मराठी वांग्मयाचा अधिक समावेश असायला हवा.
चंद्रकांत दळवी म्हणाले गेल्या 27 वर्षापासून साताऱ्याचा हा ग्रंथ सुरू आहे. इतक्या प्रदीर्घ कालावधीपासून अन्य कोणताही महोत्सव सुरू नाही साहित्य समाजाचा आरसा असतो. पुणे नंतर साताऱ्याला साहित्य परंपरा लाभली आहे. यशवंत पाटणे व शिरिष चिटणीस यांनी आपले विचार व्यक्त केले.