घरफोडी करणारा सराईत सातारा पोलिसांच्या ताब्यात

सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई

by Team Satara Today | published on : 10 March 2025


सातारा : सातारा शहरामध्ये दोन ठिकाणी घरफोडी करून तो मुद्देमाल विकण्याच्या प्रयत्नात असणार्‍या सराईताला सातारा शहर पोलिसांनी सिव्हिल हॉस्पिटल परिसरात पेट्रोलिंग दरम्यान ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली आहे.

महेश शिवाजी बाबर वय 48, रा. किकली, ता. वाई, जि. सातारा असे आरोपीचे नाव आहे.

बाबर याने सातारा शहरात विलासपूर परिसरात ऍग्रोवन ऍग्रो मशीनरी ऑफिसच्या गाळ्याचे कुलूप तोडून लॅपटॉप, आयफोन, पॉवर बँक, तसेच शाहूपुरी हद्दीतील एक बंद बंगल्याचे कुलूप तोडून चार चाकी वाहनाची चावी असे साहित्य चोरले होते. हे साहित्य तो विकण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात येणार असल्याची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाली. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला याबाबत तपास करण्याच्या सूचना दिल्या. या पथकाने सिव्हिल हॉस्पिटल परिसरात सापळा रचून महेश बाबर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने कृष्णा नगर व एमआयडीसी सातारा येथून दोन मोटरसायकल चोरी केल्याचे कबूल केले. या कारवाईत सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अशारीतीने सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाने घरफोडीचे दोन व मोटरसायकलचे दोन असे चार गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईमध्ये गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम काळे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, सुजित भोसले, निलेश जाधव, मोहन मेचकर, निलेश यादव, विक्रम माने, पंकज मोहिते, तुषार भोसले, सुहास कदम, सचिन रिटे, इरफान मुलाणी, सागर गायकवाड यांनी सहभाग घेतला.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहरातील थकबाकीदाराचे तब्बल बारा गाळे सील

संबंधित बातम्या