नवी दिल्ली : संसदेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्याच्या विरोधात देशभरात निदर्शने करण्यात आली. नमाजनंतर, पश्चिम बंगाल, गुजरात, बिहार, झारखंड, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आसाममध्ये मुस्लिमांनी रस्त्यावर उतरून निषेध केला. यामध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये दर्गे आणि मशिदींवर ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे.
वक्फ दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा दिल्याबद्दल उत्तर प्रदेश अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष अश्फाक सैफी यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या. त्यांच्या विधेयकाविरुद्ध काँग्रेस आणि एमआयएमने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कोलकाता-अहमदाबादमध्ये वक्फ बिलाची पोस्टर्स जाळण्यात आली. गुजरातमधील अहमदाबादमध्ये मुस्लिम समुदायातील शेकडो लोक रस्त्यावर जमले. त्यांच्या पोस्टर्स आणि बॅनरवर लिहिले होते, वक्फ बिल परत घ्या, यूसीसी नाकारा. पोलिसांनी 50 जणांना ताब्यात घेतले.
कोलकाता येथील पार्क सर्कस क्रॉसिंगवर हजारो लोक रस्त्यावर जमले. येथेही लोक वक्फ विधेयक रद्द करण्याची मागणी करणारे बॅनर व पोस्टर्स घेऊन निषेध केला.
वक्फ विधेयकाविरुद्ध बिहारमधील किशनगंज येथील काँग्रेस खासदार मोहम्मद जावेद आणि एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या आहेत. ज्यामध्ये ते मुस्लिम समुदायाविरुद्ध भेदभाव करणारे आणि त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारे असल्याचे म्हटले आहे. लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे प्रतोद मोहम्मद जावेद हे वक्फ (सुधारणा) विधेयक 2024 वरील संयुक्त संसदीय समितीचे (जेपीसी) सदस्य होते.
वक्फ सुधारणा विधेयकावरून देशातील मुस्लिम समाजात दोन मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. काही मुस्लिम नेते वक्फ सुधारणा विधेयकाच्या बाजूने जनजागृती करत आहेत तर काही या विधेयकाच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहे. मुंबईत वांद्रे येथे मुस्लीम समाजातील दोन गट आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. वांद्रे येथे काही मुस्लिम नेते याविषयी जनजागृती करत असताना एका गटाने त्यांना विरोध केला. त्यातून त्यांच्यात वाद झाला.
विधेयकाच्या बाजूने असणाऱ्या गटाचे म्हणणे आहे की, हे खूप चांगले विधेयक असून काही जण राजकीय पोळी भाजण्यासाठी, त्यांचं वर्चस्व टिकवण्यासाठी आमच्या समाजाची दिशाभूल करत आहे. त्यांची माथी भडकवत आहेत. आमचा समाज आणि बहुसंख्याक यांच्यात दंगल घडवण्याचा प्लॅन केला जात आहे.
मुस्लिमांमध्ये गैरसमज नको, देशातील एकता, अखंडता कायम राहण्यासाठी आम्ही कॅम्पेन चालवत आहोत. आमचे कार्यकर्ते प्रत्येक मशिदीबाहेर लोकांमध्ये जागृती निर्माण करत आहोत असे त्यांनी सांगितले. मुस्लीम समाजातील काही जणांच्या जनजागृती मोहीमेतच विधेयकाचा विरोध करणारा गट समोर आला. हे दोन्ही गट आमनेसामने आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.