सातारा : सासपडे, ता. सातारा येथे झालेल्या दुर्घटनेत आर्या सागर चव्हाण यांची मुलीची हत्या झाली. या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर खा. उदयनराजे भोसले यांनी आर्याच्या कुटुंबीयांची सोमवारी सायंकाळी उशिरा भेट घेतली. आर्याला न्याय मिळेपर्यंत आम्ही आपल्या पाठीशी आहोत. या अन्यायाच्या विरोधात आपण सर्वांनी एकजुटीने आवाज उठवला पाहिजे, अशी अपेक्षा खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.
खासदार उदयनराजे यांच्या समवेत यावेळी सुनील काटकर, कुलदीप क्षीरसागर, नयन निकम, दीपक नलावडे, सुरेश यादव, नंदकुमार गावडे इत्यादी उपस्थित होते.
उदयनराजे भोसले यांनी आर्या सागर चव्हाण यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. या कुटुंबीयांना आपली आपबीती सांगताना अश्रू अनावर झाले होते. त्यावेळी उदयनराजे भोसले यांनी त्यांना धीर दिला. या कठीण काळात आर्याच्या परिवाराच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. त्यांच्या दुःखात सहभागी होऊन आर्याला न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार केला आहे. दोषींना कठोर शिक्षा मिळेपर्यंत हा आमचा लढा सुरू राहील. आर्याच्या स्मृतीला न्याय आणि सन्मान मिळेपर्यंत आपण सर्वांनी एकजुटीने आवाज ठेवला पाहिजे. हीच तिच्या आत्म्याला खरी श्रद्धांजली ठरेल अशी अपेक्षा उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.