कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयात आज (दि.१२ डिसेंबर) बॉम्ब असल्याची अज्ञात व्यक्तीकडून धमकी मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी यांना थेट ई-मेलद्वारे ही धमकी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली असून, तातडीने शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.
आज (दि.१२) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत मेल आयडीवर एका अज्ञात व्यक्तीने धमकीचा ई-मेल पाठवला. या मेलमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या गंभीर धमकीची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संपर्क साधला आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
दरम्यान कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सुरस्थितस्थळी हालवण्यात आले असून, बॉम्ब शोधक व नाशक पथक तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात दाखल झाले आहे. पथकाकडून कार्यालयाच्या इमारतीची तसेच संपूर्ण परिसराची कसून तपासणी सुरू आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून, अग्निशमन दलाचे जवान देखील त्यांच्या वाहनांसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात दाखल झाले आहेत. धमकीच्या मेलमध्ये "कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात लावलेले ५ आरडीएक्स बॉम्ब लवकरच फुटणार आहेत" असा उल्लेख करण्यात आला आहे.
या घटनेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सर्वसामान्यांची गर्दी टाळण्यासाठी प्रवेशद्वारावर कडक तपासणी केली जात आहे, तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना टिकून राहावी यासाठी पोलीस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. ज्या ई-मेल आयडीवरून ही धमकी आली आहे, त्या अज्ञात व्यक्तीचा सायबर सेलच्या मदतीने शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.