सातारा : सातारा पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय इमारतीसाठी राज्य शासनाकडून सुमारे २८ कोटी ०६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असला, तरी प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वी तात्पुरत्या कार्यालयाच्या जागेचा प्रश्न गंभीर ठरत आहे. पर्यायी जागा निश्चित न झाल्याने प्रशासन अडचणीत सापडले असून जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून योग्य जागेचा शोध सुरू आहे.
सध्याची सातारा पंचायत समिती इमारत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असून १ फेब्रुवारी १९८९ रोजी ती पूर्ण झाली होती. मात्र गेल्या काही वर्षांत इमारतीची मोठ्या प्रमाणावर झीज झाली आहे. छत गळणे, भिंतींना पाझर येणे, फुटलेल्या काचा तसेच परिसरात सापांचा वावर यामुळे कर्मचारी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नवीन इमारतीसाठी जागेची प्राथमिक तपासणी पूर्ण झाली असून विद्यमान इमारतीच्या निर्लेखनाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. परंतु, तोपर्यंत सध्याच्या १३९ कर्मचाऱ्यांसाठी किमान ६,००० चौरस फूट जागेची आवश्यकता असून अद्याप योग्य पर्याय निश्चित झालेला नाही.
दरम्यान, पंचायत समितीचे सभापती महेश गाडे यांनी सातारा नगरपालिकेची जुनी इमारत तात्पुरत्या वापरासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे केली आहे. यावर सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त होत आहे.
प्रस्तावित नवी इमारत सुमारे ५,४०० चौरस फूट क्षेत्रावर चार मजली उभारली जाणार आहे. तात्पुरत्या कार्यालयाची व्यवस्था झाल्यानंतरच जुन्या इमारतीचे पाडकाम करून नव्या इमारतीच्या कामाला गती मिळणार आहे.