सातारा जिल्हा हादरला ; डॉक्टर महिलेने संपवले आपले जीवन

खादीला काळीमा फासण्याचा किळसवाणा प्रकार ; मुख्यमंत्र्यांचे संबंधित पोलिसांच्या तात्काळ निलंबनाचे आदेश

by Team Satara Today | published on : 24 October 2025


सातारा : संपूर्ण जिल्ह्यात दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असताना दुसरीकडे मात्र फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ महिला डॉक्टरने फलटण येथीलच एका पोलीस निरीक्षकाने आपल्यावर चार वेळा अत्याचार केला तर त्या निरीक्षकाचा सहकारी असणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबलने आपला  छळ केल्याचा आरोप करत आपले जीवन संपवल्यामुळे सातारा जिल्हा पुरता हादरून गेला असून, या आरोपामुळे खादीला काळीमा फासण्याचा किळसवाणी प्रकार या निमित्ताने उघड झाला आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत संबंधित पोलिसांच्या तात्काळ निलंबनाचे आदेश देत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित वरिष्ठ महिला डॉक्टर ही फलटण, ता. फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत होती. संबंधित महिला डॉक्टर गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागाच्या एका वादामध्ये अडकली होती. तपासणी संदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्या महिला डॉक्टरची खाते अंतर्गत चौकशी सुरू होती. त्यामुळे आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना त्या महिला डॉक्टरची झाली होती. चौकशीमुळे संबंधित महिला डॉक्टर गेल्या अनेक महिन्यांपासून मानसिक तणावाखाली वावरत होती. याबाबत त्या महिला डॉक्टरने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून माझ्यावर अन्याय होत असून मी आत्महत्या करीन, असा इशारा देऊनही वरिष्ठांनी या इशाऱ्याची कोणतीच दखल न घेतल्यामुळे संबंधित महिला डॉक्टरने फलटण येथील एका हॉटेलमध्ये आपले आयुष्य संपवले. या घटनेची माहिती गुरुवारी रात्री उशिरा समजताच फलटण शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित महिला डॉक्टरचा मृतदेह ताब्यात घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार मृत्यूपूर्वी संबंधित महिला डॉक्टरने आपल्या हातावर फलटणचा पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याने आपल्यावर चार वेळा अत्याचार केला असून पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत बनकर याने गेल्या काही महिन्यांपासून शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचे लिहिल्याचे आढळून आले आहे. प्रारंभी प्राथमिक तपासा नुसार ही आत्महत्या असल्याचे पोलिसांनी सांगितले होते त्यानंतर मात्र महिला डॉक्टरच्या हातावर लिहिलेल्या मजकुरानंतर या आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण लागल्यामुळे संपूर्ण सातारा जिल्हा पुरता हादरून गेला आहे. याबाबत अद्याप फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दिवाळी झाली, भाऊबीजेलाही नाही; लाडक्या बहिणींना सरकारकडून ओवाळणी कधी ?

संबंधित बातम्या