महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील कळमगाव मुरा येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य करत धुमाकूळ घातला आहे. घरांची कुलपे तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेवर डल्ला मारला. एकाच परिसरातील दोन घरांमधून तब्बल २ लाख ८९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असून, आणखी एका घरातही चोरीच्या उद्देशाने प्रवेश केल्याचे उघड झाले आहे. या घटनांमुळे गावासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कळमगाव मुरा येथील लक्ष्मण कोंडीबा हिवरे (वय ३०) हे महाबळेश्वर बाजारपेठेतील एका किराणा दुकानात काम करतात. कामानिमित्त ते दि. २४ नोव्हेंबर रोजी पुण्याला गेले होते. दि. २६ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता ते घरी परतले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. घरात प्रवेश करून पाहणी केली असता कपाटातील कपडे अस्ताव्यस्त पडलेले, तर दागिन्यांचे बॉक्स उघड्या अवस्थेत आढळले.
घराची तपासणी केली असता सोन्याचे मंगळसूत्र, मणीमंगळसूत्र, कानातील झुमके, अंगठ्या, सोन्याची चेन, नथ, चांदीचे छल्ले, जोडवी, पैजण तसेच ३० हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. चोरीस गेलेल्या या ऐवजाची एकूण किंमत अंदाजे २ लाख १६ हजार रुपये असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हिवरे यांनी शेजारी राहणारे अजय शंकर आखाडे यांना चोरीची माहिती दिली.
त्यानंतर आखाडे यांनीही आपल्या घराची पाहणी केली असता घराचे कुलूप तोडून पेटीतील दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे आढळले. त्यांच्या घरातून अंदाजे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणीमंगळसूत्र, ५ ग्रॅम वजनाचे कानातील झुमके, चांदीचे पैजण आणि ३५ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ७३ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. दरम्यान, गावातील ७६ वर्षीय कृष्णा नारायण जाधव यांच्या घराचेही कडी-कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. एकाच परिसरात घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील कळमगाव मुरा येथे घरफोडी; तीन लाखांचा ऐवज लंपास, चोरट्यांकडून बंद घरांना लक्ष्य
by Team Satara Today | published on : 29 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा