खंडाळा : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात आज (रविवार) सकाळी ऑइल वाहतूक करणाऱ्या टँकरला गळती लागल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत एकेरी मार्गाने वाहतूक सुरू करून मोठा अनर्थ टाळला. महामार्ग पोलिसांच्या तत्परतेमुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प न होता नियंत्रित ठेवण्यात यश आले. सध्या टँकर हटविण्याचे काम सुरू असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरच्या दिशेने जाणारा ऑइल टँकर सकाळी साडेनऊच्या सुमारास खंबाटकी घाटातील चौथ्या वळणाजवळ पोहोचला असता त्यातून अचानक ऑइलची गळती सुरू झाली. त्यामुळे रस्त्यावर तेल सांडल्याने वाहनचालकांमध्ये काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देत खबरदारीचा उपाय म्हणून एका लेनमधून वाहतूक सुरू केली. तसेच टँकर रस्त्याच्या कडेला हलविण्यासाठी क्रेनच्या सहाय्याने काम सुरू करण्यात आले.