सातारा : जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा यांनी जिल्हा परिषद साताऱ्याच्या अध्यक्षा डॉ. प्रिया मधुकर बर्गे उर्फ सौ. प्रिया महेश शिंदे यांच्या जात पडताळणी प्रकरणासंदर्भातची सुनावणी दि. १६ जूनला सकाळी ११ वाजता समितीच्या कार्यालयात होणार आहे. तक्रारदार संतोष तुकाराम साळुंखे (रा. विसापूर, ता. खटाव, जि. सातारा) यांनाही या सुनावणीसाठी नोटीस बजावण्यात आली आहे.
जात पडताळणी समितीने दि. ९ एप्रिलला प्राप्त झालेल्या तक्रार अर्जाची दखल घेत प्राथमिक चौकशी व कागदोपत्री पडताळणीसाठी सुनावणी आयोजित केली आहे. दरम्यान, तक्रारदार संतोष साळुंखे यांनी सुनावणीवेळी उपस्थित राहून आपले लेखी अथवा तोंडी म्हणणे मांडावे तसेच तक्रार सिद्ध करणारे आवश्यक शालेय, महसुली किंवा अन्य कागदोपत्री पुरावे सादर करावेत, असे त्यांना बजावण्यात आलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
समितीने स्पष्ट केले आहे की, निर्धारित तारखेला तक्रारदार अनुपस्थित राहिल्यास त्यांचे कोणतेही म्हणणे नसल्याचे गृहित धरून उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे प्रकरणाचा एकतर्फी निर्णय घेतला जाऊ शकतो. ही नोटीस जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा येथील उपायुक्त तथा सदस्य यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आली आहे.